जनमताचा आवाज बनण्याचे काम करणार : अजित पवार

मिलिंद संगई
Sunday, 27 October 2019

- जनतेच्या कौलमुळे राष्ट्रवादी व काँग्रेसवरील जबाबदारी अधिक वाढली

बारामती शहर : राज्याच्या जनतेने जो कौल दिलेला आहे त्यामुळे राष्ट्रवादी व काँग्रेसवरील जबाबदारी अधिक वाढलेली आहे, जनतेने जो विश्वास आमच्यावर दाखविलेला आहे, त्या विश्वासाला पात्र राहून विकासप्रक्रिया अधिक वेगाने पुढे नेत जनमताचा आवाज बनण्याचे काम आम्ही करु, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. तसेच अजित पवार यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या. 

निकालानंतर अजित पवार गेले कुठं? असा प्रश्न सर्वत्र उपस्थित होत होता. मात्र, मी बारामतीतच होतो, कोठेही गेलेलो नव्हतो व दिवाळीच्या पाडव्याला मी गोविंदबागेमध्ये सर्वांनाच भेटणार आहे, असे अजित पवार यांनी सांगितले. मतदानानंतर सांगण्यासारखं फारसं काही नव्हतं म्हणून मी माध्यमांसमोर आलो नाही, असा खुलासाही अजित पवार यांनी केला. 

बारामतीकरांनी राज्यात विक्रमी मताधिक्य दिल्याबद्दलही अजित पवार यांनी बारामतीकरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी मी या पुढील काळात अधिक वेगाने काम करणार असल्याचे ते म्हणाले. 

अज्ञातवासात नव्हतो

मी कोठेही अज्ञातवासात गेलेलो नव्हतो. पाडव्याला गोविंदबागेत शरद पवारसाहेबांसोबत मीही लोकांना भेटतो. त्यानुसार सोमवारी (ता. 28) मी सर्वांना भेटणार असल्याचे ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Political Statement of NCP Leader Ajit Pawar