आळंदीसारख्या तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी स्वच्छतागृहांची दुरवस्था; प्रशासनाचे दुर्लक्ष

विलास काटे
रविवार, 2 ऑगस्ट 2020

आळंदी येथे तिर्थक्षेत्र विकास आराखडा निधीतून बांधलेल्या  शौचालयांची दुरावस्था झाली आहे.

आळंदी : शौचालये बाहेरून भिंती रंगविल्या.पण आत अस्वच्छतेमुळे पाय ठेवूशी वाटत नाही.नाक मुठीत धरून आत गेलोच तर पाणी असेल याची खात्री नाही. एवढे करूनही आतील भांड्यांची सफाई नसल्याने साहेब सांगा शौचालयात कसे जायचे असा सवाल आळंदीकर आणि वारकरी प्रशासनास विचारत आहे.

राज्यतिर्थक्षेत्र विकास आराखडा निधीतून आळंदी शहरात विविध ठिकाणी शौचालये बांधली. मात्र स्थानिक पालिकेने निगा न राखल्याने अनेक ठिकाणी शौचालयांना टाळे तर काही ठिकाणी अस्वच्छता असल्याचे चित्र आहे. कोट्यावधी रूपये खर्चूनही नागरिकांना उपयोग होत नसेल तर पालिकेचा आरोग्य विभाग काय कामाचा असा सवाल सध्या नागरिकांकडून विचारला जातोय.

गेली पाच वर्षांपासून आळंदीत राज्य तिर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून नागरिकांच्या सोयीसाठी चांगल्या दर्जाची सार्वजनिक सुलभ शौचालये असावीत यासाठी शासनाने सुमारे पंचविस कोटींचा निधी मंजूर केला होता. शहरात विविध बत्तीस ठिकाणी शौचालये बांधली जाणार होती. पैकी चौदाहून अधिक ठिकाणी सुलभ शौचालयांचे काम पूर्ण झाले. तर देहूफाटा,चाकण चौक,वडगाव चौकातील गोशाळेशेजारी दुमजली शौचालये बांधले. दरम्यान शहरातील शौचालयांची अवस्था पाहून त्यामधे कोणीही वापरासाठी जात नसल्याचे चित्र आहे. शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शौचालयांमधे तुटलेली भांडी,अस्वच्छता दिसून येते. अनेक ठिकाणी रिकाम्या बाटल्या,गुटक्याच्या पुड्या आढळून येत आहे.

तसेच शौचालयांना पाण्याची कमतरता आहे. अनेक ठिकाणी शौचालयांत नळ नाही. तर काही शौचालयांचा परिसर अस्वच्छ असल्याने तिथे नागरिक वापर करत नाहीत. शौचालये साफ करण्यासाठी नियमित सफाई कर्मचारी येत नसल्याचे चित्र आहे. अनेकदा शौचालयांचा वापर गर्दुले आणि मद्यपी करत आहे. शौचालयात रात्रीच्या वेळी लाईटची सोयही नाही. एकंदर स्वच्छतेसाठी कोट्यावधी रूपयांचा निधी खर्चून शासनाने मोठी शौचालये नागरिकांच्या सोयीसाठी उभारली. मात्र स्थानिक पालिकेने लक्ष न ठेवल्याने आणि निगा न राखल्याने शौचालयात अस्वच्छता दिसून येते.

प्रदक्षिणा रस्त्यावरिल शौचालयांचीही अवस्था पाहिली तर न वापरलेले बरे असे चित्र सध्या आहे.बसस्थानकाजवळील शौचालयात पैसे देवूनही अस्वच्छता पाहायला मिळते.स्वच्छ भारत अभियानात सहभाग घेत लाखो रूपयांची बिले काढली. मात्र शौचालयांच्या अवस्थेमुळेच पालिका त्या स्पर्धेतही सातत्याने नापास होत आल्याचे चित्र आहे. आता मुख्याधिकारी अंकूश जाधव नुकतेच नव्याने बदली होवून आळंदीत रुजू झाले असून प्रशासकिय कामकाजात सुधारणा होईल अशी आशा आळंदीकर आणि वारकरी बाळगून आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Poor condition of toilets at Alandi