PuneRains : आजपासून पाच दिवस पुण्यात पावसाची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

- विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागातही पावसाची हजेरी 

पुणे : सप्टेंबरअखेरपर्यंत तरी पाऊस पुणेकरांची पाठ सोडणार नाही, असा अंदाज हवामान खात्याने बुधवारी वर्तविला. शहर आणि परिसरात गुरुवारी (ता. 26) हलक्‍या ते मध्यम पावसाची शक्‍यता आहे. तसेच, त्यानंतर पुढील दोन दिवस म्हणजे शुक्रवारी (ता. 27) आणि शनिवारी (ता. 28) ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या हलक्‍या सरी पडतील, असेही हवामान खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले. 

शहरात गेले दोन दिवस धुवाधार पाऊस पडत आहे. हस्त नक्षत्रात प्रवेश केल्यानंतर शहराच्या मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठवाड्याच्या काही भागातही पावसाने हजेरी लावली. शहर आणि परिसरात पुढील पाच दिवस पावसाची 51 ते 75 टक्के शक्‍यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले. 

भारतीय हवामान खात्याचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपन कश्‍यपी म्हणाले, ""मध्य महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, रॉयलसीमा या भागावर वाऱ्याची चक्रीय स्थिती आहे. त्याचवेळी उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रावर चक्रवात आहे. यामुळे पुण्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. पुण्यात पुढील चोवीस तासांमध्ये हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल; तर त्यानंतर महिनाखेरपर्यंत ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी पडत राहील.'' 

अरबी समुद्रातील हिक्का चक्रीवादळ आणि बंगालच्या उपसागर व आंध्र प्रदेशाचा दक्षिण भाग ते तमिळनाडूच्या उत्तर भागात असलेल्या चक्राकार स्थितीचा परिणाम राज्यातील हवामानावर होत आहे. राज्यातील बहुतांश भागांत बुधवारी दिवसभर हवामान ढगाळ होते, असेही खात्यातर्फे सांगण्यात आले. 

पावसाची "हजारी' मजल 
पुण्यात यंदाच्या पावसाळ्यातील एक हजार मिलिमीटरचा टप्पा पावसाने बुधवारी गाठला. 1 जूनपासून ते 25 सप्टेंबरपर्यंत शहरात 1018.3 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पाषाण येथे 1133.9 आणि लोहगाव येथे 882.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Possibility of Five days from today