पुणेकरांनो, तुम्ही विद्यापीठ चौकमार्गे प्रवास करता? वाहतुकीतील नवा बदल जाणून घ्या!

Pune_University_Bridge
Pune_University_Bridge

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील उड्डाणपुल पाडण्याच्या कामाने वेग घेतला असतानाच शुक्रवार (ता.२४) पासून लॉकडाऊन संपणार असल्याने गणेशखिंड रस्त्यावर आणि विद्यापीठ चौकात रहदारीवेळी वाहतूक समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. वाहतूक शाखेने वाहतूक बदलण्याबरोबरच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना करण्यावर भर दिला आहे. 

पुणे महानगर विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) विद्यापीठ चौकात उड्डाणपूल पाडून तेथे नवीन पूल बांधण्याचे नियोजन केले आहे. तसेच तेथे मेट्रो पूल देखील बांधला जाणार आहे. त्यानुसार मागील आठवड्यात लॉकडाऊन सुरु होताच पूल पाडण्याचे काम हाती घेण्यात आले. पहिल्या टप्यात चतु:शृंगी येथे उतरणारा व पाषाणकडे जाणाऱ्या पुल तोडण्यात आला आहे. बाणेरकडे जाणारा पूल बाणेरकडील बाजूस तोडला आहे.

इथे वाहतूक समस्या उद्भवण्याची शक्यता

शुक्रवारी 10 दिवसांचा लॉकडाऊन संपत आहे. त्यानंतर या रस्त्यावर वाहनाची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते. दररोज सकाळी पिंपरी-चिंचवडसह बाणेर, बालेवाडी, औंध येथील वाहने विद्यापीठ चौकात एकत्र येतात. त्यानंतर सिग्नलनुसार वाहने शिवाजीनगर व सेनापती बापट रस्ता येथे जातात. आता मात्र आता विद्यापीठाकडुन चतु:शृंगीकडे जाणारा रस्ता बंद आहे. त्यामुळे तिन्ही रस्त्यावरील वाहने शिवाजीनगरच्या दिशेने निघतील. त्यावेळी विद्यापीठ चौक ते ईस्क्वेअरपर्यंत वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. याबरोबरच सायंकाळी 6 नंतर सेंट्रल मॉल, ओम सुपर मार्केट,जेडब्ल्यू मेरीयट हॉटेल चौक व चतु:शृंगी कॉर्नर व विद्यापीठ चौकात वाहतूक कोंडी होऊ शकते.

असा आहे वाहतूक बदल 
- औंध, बाणेर, पाषाण येथून येणाऱ्या वाहनाना विद्यापीठ चौकातुन सरळ शिवाजीनगरला जाता येईल.
- चतु:शृंगी कॉर्नरवरुन सेनापती बापट रस्त्यावर वळता येणार नाही.
- शिवाजीनगरहून सेंट्रल मॉलपासून काही मीटर अंतरावर असलेल्या धोत्रे पथावरुन ओम सुपर मार्केट, जेडब्ल्यू मेरीयट हॉटेल चौक व चतु:शृंगी कॉर्नर व विद्यापीठ चौक
- औंधकडे जाणाऱ्या वाहनाना औंधकडुन येणाऱ्या रस्त्यावर केलेल्या दुहेरी मार्गातुन राजभवनपर्यंत व तेथुन सरळ रस्तयाने जाता येईल. पाषाणकडे नेहमीप्रमाणे जाता येईल. तर बाणेरकडे जाणाऱ्या वाहनाना अभिमान श्री सोसयटीला वळस घालुन पुढे जाता येईल.
- विद्यापीठ चौकातील ताण टाळण्यासाठी वाहनचालकांनी खडकी मार्गे किंवा चांदणी चौक मार्गे पुण्यात जाण्यास प्राधान्य देण्याचे पोलिसांचे आवाहन

असे आहे वाहतुकीचे नियोजन
चतु:शृंगी वाहतूक शाखेचे 30 पोलिस कर्मचारी तीन टप्प्यात शुक्रवारपासून विद्यापीठ चौक आणि परिसरात कार्यरत राहणार आहेत. "सकाळी आणि सायंकाळी काही प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. मागील लॉकडाऊन पाहता वाहने कमी प्रमाणात येतील असे वाटत आहे, तरीही वाहनांची गर्दी किती होईल, याबाबत उद्याच कळेल."
- प्रकाश मोरे, सहायक पोलिस निरीक्षक, चतु:शृंगी वाहतूक विभाग.

"पीएमआरडीए'कडून वाहतूक समस्या निर्माण होऊ नये, तसेच कामाच्या ठिकाणी नागरीकांच्या सुरक्षेसाठी 'पीएमआरडीए'चे 60 ते 65 कर्मचारी काम करत आहेत. बैरिकेड्स, मार्शलद्वारे सुरळीत वाहतूक आणि नागरिकांच्या सुरक्षेला आमचे प्राधान्य आहे."
- विवेक खरवडकर, मुख्य अभियंता, पीएमआरडीए.

पीएमआरडीएच्या 2017 च्या सर्वेक्षणानुसार जाणाऱ्या वाहनाची संख्या

- दर तासाला जाणारी वाहने - 22 हजार 
- दर तासाला उड्डाणपुलाचा वापर करणारी वाहने - 5 हजार

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com