
पुणे - गुंठेवारीतील घरे अथवा इमारतींना देखील आता टीडीआर वापरून बांधकाम करणे शक्य होणार आहे. मात्र, त्यासाठी रस्तारुंदीची अट कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे सहा मीटर रुंदीच्या रस्त्यावर दीड मीटर अंतर सोडून बांधकाम केल्यास मान्य ‘एफएसआय’च्या अधिक ५० टक्के टीडीआर वापरून बांधकाम करणे शक्य होणार आहे.
मुंबई आणि ‘पीएमआरडीए’ची हद्द वगळता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी राज्य सरकारकडून नव्याने ‘युनिफाईड डीसी रूल’ लागू करण्यात आले आहेत. त्यामध्ये अनेक नवीन तरतुदी करण्यात आल्या आहेत. या तरतुदी करताना गुंठेवारीच्या बांधकामांचा देखील राज्य सरकारने विचार केला आहे.
छोट्या जागा मालकांना दिलासा देण्यासाठी आणि विनापरवाना बांधकामे अधिकृत करण्यासाठी राज्य सरकारकडून २००१ मध्ये गुंठेवारी कायदा राज्यभर लागू करण्यात आला. या कायद्यानुसार शुल्क भरून बांधकामे नियमित करून देण्याचे अधिकार राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले होते. त्यानुसार पुणे महापालिकेने २००८ पर्यंत वेळोवेळी मुदत वाढ देऊन गुंठेवारी कायद्यांतर्गत शुल्क आकारून घरे नियमित केली. पुणे शहरात या कायद्यांतर्गत काही हजार घरे नियमित झाली; परंतु या घरांचा पुनर्विकास करावयाचा झाल्यास अनेक अडचणी येत होत्या. विशेषत: रस्ता रुंदीची मोठी अडचण होती. त्यामुळे पुनर्विकास करताना टीडीआर वापरून बांधकाम करण्यास यापूर्वी बंदी होती. ती आता दूर झाली आहे सहा मीटर आणि त्याच्या आतील रस्त्यांवर मात्र नव्या नियमानुसार टीडीआर वापरून बांधकाम करण्यास बंदी कायम असणार आहे; परंतु सहा मीटरच्या वरील रस्त्यावर दोन्ही बाजूस दीड मीटरचे अंतर सोडून बांधकाम केल्यास त्यांना टीडीआर वापरून बांधकाम करणे शक्य होणार आहे. त्यामुळे तेथील रस्ते देखील रुंद होण्यास मदत होणार आहे.
कसा मिळणार टीडीआर?
शहरातील निवासी जमिनींवर बांधकाम करताना त्या जागेपुढील रस्ता नऊ मीटर रुंदीचा असेल, तर मान्य एफएसआय १.१० आहे. त्यावर आता जास्तीत जास्त ४० टक्के टीडीआर वापरून बांधकाम करता येते. गुंठेवारीतील घर अथवा इमारतींपुढील रस्ता नऊ मीटर रुंदीचा असेल, तर त्यांना दीड मीटर जागा सोडून २० टक्के अधिकचा टीडीआर वापरून बांधकाम करणे शक्य होणार आहे. त्यामुळे मान्य १.१० ‘एफएसआय’ अधिक २० टक्के टीडीआर असा मिळून १.३० ‘एफएसआय’ वापरून बांधकाम करणे शक्य होणार आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
येथेही मिळणार परवानगी
मुख्य रस्त्यापासून पन्नास मीटर आत असलेल्या आणि रस्त्याचा शेवट असलेल्या भागातील बांधकामांना यापूर्वी टीडीआर वापरण्यास परवानगी देण्यात येत होती. मात्र त्यासाठी रस्ता किमान नऊ मीटर रुंदीचा रस्ता असणे बंधनकारक होते. या नियमात देखील ‘युनिफाईड डीसी रूल’मध्ये सवलत देण्यात आली.
वीस वर्षांपूर्वी सिंहगड रस्त्यावर आनंदनगर भागात मी घर घेतले. गुंठेवारी कायद्यांतर्गत ते नियमित करून घेतले आहे. त्याचा पुनर्विकास करावयाचा म्हटले, तर टीडीआर वापरता येत नव्हता. आता मात्र हे शक्य होणार आहे. हा चांगला निर्णय आहे.
- प्रसाद कुलकर्णी, गुंठेवारीधारक
शहरात अनेक दाटीवाटीच्या भागात गुंठेवारीच्या इमारती झाल्या आहेत. त्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे. तसेच, त्या भागातील रस्ते रुंद होण्यास देखील मदत होणार आहे.
- सुधीर कुलकर्णी, अध्यक्ष, नागरी हक्क संस्था
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.