ट्रस्टच्या मिळकत विक्रीला वैधता तपासून परवानगी शक्य; उच्च न्यायालयाचा निर्णय

ट्रस्टची मिळकत विक्री करण्याची कायदेशीर गरज असल्याबाबत विश्वस्तांचा ठराव झाल्यावर विक्रीतून येणाऱ्या मोबदल्यातून ट्रस्टच्या उद्दिष्टांना पूरक कार्य होणे अपेक्षित आहे.
Mumbai high court
Mumbai high courtSakal
Summary

ट्रस्टची मिळकत विक्री करण्याची कायदेशीर गरज असल्याबाबत विश्वस्तांचा ठराव झाल्यावर विक्रीतून येणाऱ्या मोबदल्यातून ट्रस्टच्या उद्दिष्टांना पूरक कार्य होणे अपेक्षित आहे.

पुणे - ट्रस्टची मिळकत (Trust Property) विक्री (Sale) करण्याची कायदेशीर गरज असल्याबाबत विश्वस्तांचा ठराव झाल्यावर विक्रीतून येणाऱ्या मोबदल्यातून ट्रस्टच्या उद्दिष्टांना पूरक कार्य होणे अपेक्षित आहे. तसेच, मिळकत विक्रीतून सर्वोत्तम मूल्य ट्रस्टला मिळत असल्यास व्यवहाराची वैधता तपासून मिळकत विक्रीस परवानगी देता येईल, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) नागपूर खंडपीठाने दिला आहे.

नागपूर येथील एका ट्रस्टच्या दूर अंतरावर असलेल्या शेतजमिनींची विश्वस्तांना योग्य प्रकारे देखभाल करता येत नव्हती. त्यामुळे त्या जमिनीची विक्री करायला परवानगी देण्याचा अर्ज तेथील सह धर्मादाय आयुक्तांनी दोन वेळा फेटाळला होता. या निर्णयाच्या विरोधात दाखल रिट याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या जमिनीची विक्री करण्यास परवानगी देण्याचा निर्णय दिला आहे.

न्या. अविनाश घरोते यांनी निकालपत्रात ट्रस्ट मिळकत विक्रीची कायदेशीर गरज आणि योग्य कारणे याबाबत मीमांसा करताना काही निकष निकालपत्रात नमूद केले आहेत. त्यानुसार ट्रस्टच्या जमिनी खूप दूर अंतरावर असतील आणि त्यांची वहिवाट व संरक्षण करणे विश्वस्तांना अशक्य होत असेल. अशा मिळकतींवर अतिक्रमण होण्याची दाट शक्यता असल्यास ताबा मिळवण्यासाठी विश्वस्तांना कोर्टकचेरीत गुंतून पडावे लागणार असेल. ट्रस्टची इमारत जीर्ण होऊन त्याची दुरूस्ती अथवा पुनःनिर्माण अपुऱ्या निधी अभावी अशक्य असेल. ट्रस्ट मिळकतीमधून अतिशय तुटपुंजे उत्पन्न प्राप्त होत असल्यास किंवा मिळकत विक्रीशिवाय ट्रस्टची उद्दिष्ट साध्य करण्यास इतर काही पर्यायच नसेल तर या परिस्थितीचा सर्वंकष विचार करून विक्रीसाठी परवानगीची मागणी योग्य असेल, असा अभिप्राय निकालपत्रात नमूद केला आहे.

कायद्याने आणि विविध न्यायनिर्णयांचे अनुषंगाने अभिप्रेत असलेल्या चतुःसूत्रीचा विश्वस्तांनी अवलंब केला असल्यास ट्रस्ट मिळकत विक्रीसाठी धर्मादाय आयुक्तांनी पूर्वपरवानगी देण्याचा उचित निर्णय घ्यावा. तसेच, प्रत्येक ट्रस्टची मिळकत विक्रीची गरज ही वेगवेगळी असू शकते. आवश्यकता तपासून त्यानुसार कार्यवाही करावी, असेही निर्देश दिले आहेत.

ट्रस्ट मिळकत विक्रीबाबत उच्च न्यायालयाच्या निकालामुळे एक ठोस मार्गदर्शक प्रणाली मिळाली आहे. विभागीय सह धर्मादाय आयुक्तांकडून पूर्वपरवानगी प्रक्रिया जलदगतीने होईल, अशी अपेक्षा आहे.

- ॲड. शिवराज कदम जहागीरदार, अध्यक्ष, पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com