chatrpati shugar
chatrpati shugar

पृथ्वीराज जाचक यांच्या आरोपांचे प्रशांत काटे यांच्याकडून पोस्टमॉर्टेम

वालचंदनगर (पुणे) : इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने यंत्रसामग्रीची खरेदी उच्च दर्जाची केली आहे. कारखान्याच्या गाडीचा वापर कारखान्याच्या कामासाठी करण्यात येत आहे. कारखान्याचा कारभार कोणत्याही चुकीच्या पद्धतीने सुरु नाही. याबाबत कोणीही काळजी करु नये. कारखान्याबाबत चुकीच्या अफवा पसरवून कारखान्याची प्रतिमा मलीन करू नका, असे आवाहन छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी केले आहे.

कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी कारखान्याच्या कारभारावर ताशोरे ओढत अनेक आरोप केले होते. याला आज विद्यमान अध्यक्ष प्रशांत काटे यांनी उत्तर दिले आहे. काटे यांनी सांगितले की, आम्हाला कोणावरही टीका करायची नाही. मात्र, सातत्याने  कारखान्याच्या बाबतीत चुकीच्या अफवा पसरवून कारखान्याची प्रतिमा मलीन केली जात आहे. तसेच, संचालक मंडळाची बदनामी केली जाते. छत्रपती कारखान्याने यंत्रसामग्रीची खरेदी करताना दर्जाला महत्व दिले असून, उच्च दर्जाची खरेदी केली आहे. कारखान्यामध्ये संचालक मंडळाच्या ५ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीमध्ये १०० कामगारांना नोकरीचा आदेश दिल्याची चर्चा निरर्थक आहे. कारखान्यातील आजपर्यंतची भरतीची प्रक्रिया साखर आयुक्तांनी ठरवून दिलेल्या आकृतीबंधाप्रमाणेच व तांत्रिक जागा या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील प्राधिकृत अधिकाऱ्यांनी मुलाखती घेतल्यानंतरच केली आहे. 

कारखान्याच्या वाहनाचा गैरवापर होण्याचा प्रश्नच नाही. कोरोनाचे संकट असताना व मलाही कोरोनाची लागण झाल्याने उपचारासाठी दाखल झाल्यानंतर नेमका त्याच काळात कारखान्याच्या प्रलंबित विषयावर व आगामी गाळप हंगामाच्या दृष्टीने कारखान्याचे संचालक मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री यांच्यासह इतर मंत्र्यांना मंत्रालयामध्ये भेटण्यासाठी पाठविले होते. कोणत्याही संचालकाने खासगी कामासाठी कारखान्याच्या  गाडीचा वापर केला नाही. कारखान्यामध्ये यंत्रसामग्रीत बदल करण्याचा आरोप निरर्थक असून सहवीजनिर्मिती प्रकल्पातील वीजयुनिट वाढविण्याच्या दृष्टीने योग्य व महत्वाची कामे आवश्यक आहेत. तीच केली जात आहेत. सध्या साखर कारखानदारी अडचणीच्या स्थितीतून जात असताना कारखान्यातील सुरू असलेल्या कामांना आगामी गळीत हंगामाच्या दृष्टीने पाठबळ देण्याची गरज असताना कारखान्यावर निरर्थक आरोप करू नये, असे आवाहन काटे यांनी केले.

छत्रपती साखर कारखान्याचे चालू वर्षी १२ लाख टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ठ आहे. ऊस तोडणी वाहतुकीच्या पहिल्या हप्त्यांनतर दुसरा हप्त्याचे वितरण येत्या दोन दिवसांत केले जाणार असून, जास्ती उस तोडणी कामगार आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. 
 - प्रशांत काटे, अध्यक्ष, छत्रपती साखर कारखाना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com