esakal | अजित पवारांनी लक्ष घातल्याने सोमेश्वरनगरचा 'हा' प्रश्न लागला मार्गी
sakal

बोलून बातमी शोधा

veej.jpg

वीजकंपनीचा सोमेश्वरनगर उपविभाग सासवड विभागातून काढून पुन्हा बारामती विभागास जोडण्याचा अधिकृत निर्णय झाला आहे.

अजित पवारांनी लक्ष घातल्याने सोमेश्वरनगरचा 'हा' प्रश्न लागला मार्गी

sakal_logo
By
संतोष शेंडकर

सोमेश्वरनगर : वीजकंपनीचा सोमेश्वरनगर उपविभाग सासवड विभागातून काढून पुन्हा बारामती विभागास जोडण्याचा अधिकृत निर्णय झाला आहे. यामुळे बारामतीच्याच ४१ हजार वीजग्राहकांची तार पुन्हा 'बारामती'शी जुळणार आहे. दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याप्रश्नी लक्ष घातल्याने एरवी संथगतीने चालणाऱ्या वीजकंपनीने अकरा वर्षाचा हा प्रश्न अवघ्या महिनाभरात वीजेच्या वेगाने मार्गी लावला.

दरम्यान, २००९ पर्यंत वीजकंपनीचा सोमेश्वरनगर उपविभाग बारामती विभागांतर्गत कार्यरत होता. मात्र, सासवड विभागाची निर्मिती केल्यावर भोर, नीरा, सासवड यासह सोमेश्वरनगर समाविष्ट केला. सासवड विभागास ग्राहक मिळाले परंतु तेव्हापासून घरगुती ग्राहक, शेतकरी, उद्योजक यांच्या छोट्या-मोठ्या कामासाठी सासवड वाऱ्या सुरू झाल्या.

देशाचा जलखजिना आता एकाच क्लिक वर

सोमेश्वरनगर उपविभाग पूर्णतः बारामती तालुक्यात येतो. सर्व ग्राहकांची वीज वगळता अन्य सर्व कामांसाठी बारामतीलाच ये-जा असते. मात्र, सोमेश्वरनगर उपविभगीय कार्यालयापासून सासवड हे ६५ किलोमीटर तर बारामती ३५ किलोमीटर आहे. उपविभागातील लाटे, कोऱ्हाळेसारख्या गावांपासून सासवड नव्वद किलोमीटर तर बारामती अवघी २० किलोमीटर येते. परिणामी ग्राहक बारामतीशी जोडा अशी मागणी करत होते. चार वर्षापूर्वीदेखील बारामतीच्या अधिक्षक अभियंत्यांनी त्याबाबतचा प्रस्ताव वीजकंपनीला पाठविला होता परंतु त्याला वाटाण्याच्या अक्षताच लावल्या गेल्या होत्या.

याबाबत लोकभावना राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, पंचायत समितीचे उपसभापती बापू धापटे, दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, अनिल खलाटे यांनी पवारांकडे मांडल्या. पवार यांनी ४ जुलै रोजी वीजकंपनीचे अधिकारी व पदाधिकारी यांची एकत्रित बैठक घेतली. सासवड विभागाचा समतोल ढळणार नाही हे समजल्यावर सोमेश्वर उपविभागाचे बारामतीस जोडण्याच्या सूचना केल्या केल्या. यानंतर त्वरीत प्रस्ताव तयार करून वेगवेगळे टप्पे ओलांडून वीजेच्या वेगाने वीजकंपनीच्या मुंबईतील राज्य कार्यालयात पोचला आणि तिथेही कालच मुख्य महाव्यवस्थापक शिवाजी इंदलकर यांनी अधिकृत तसा निर्णय घेतला. यासाठी प्रशासकीय पाठपुरावा केल्याबद्दल बारामती परीमंडलचे अधिक्षक अभियंता सुनिल पावडे यांचा राष्ट्रवादीकडून सत्कार करण्यात आला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संभाजी होळकर म्हणाले, ''अजितदादा सार्वजनिक हिताची कामे कीती वेगाने करतात हे सिध्द झाले आहे. त्यांच्या आदेशानंतर सोमेश्वर उपविभाग व सासवड विभागाने माहिती जमा केली. बारामती ग्रामीण मंडलचे अधिक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील यांनी बारामती परिमंडलचे मुख्य अभियंता सुनिल पावडे यांना प्रस्ताव दिला. पुढे तो प्रादेशिक संचालक व त्यानंतर मुख्य महाव्यवस्थापकांना सादर केला. सहा टप्पे महिन्यात ओलांडले.  

'बारामती'त आता पाच उपविभाग -
संरचना बदलल्याने आता बारामती विभागात पाच तर सासवड विभागात तीनच उपविभाग राहणार आहेत. बारामती विभागाची कर्मचारी संख्या ६१६ वरून ७३४ तर सासवड विभागाची कर्मचारीसंख्या ४७२ वरून ३५४ होणार आहे. तसेच बारामतीची ग्राहकसंख्या २ लाख ३० हजार ३७९ वरून २ लाख ७१ हजार ९१७ तर सासवडची ग्राहकसंख्या १ लाख ६९ हजार ५०९ वरून १ लाख २७ हजार ९७१ इतकी होणार आहे.   

बारामती विभाग (एकूण ग्राहक २,७१,९१७)
बारामती शहर उपविभाग    - ४४९६१
बारामती ग्रामीण उपविभाग  - ६८४५६
इंदापूर उपविभाग          - ६५१२७
वालचंदनगर उपविभाग      - ५१८३५
सोमेश्वरनगर उपविभाग     - ४१५३८

सासवड विभाग  (एकूण ग्राहक - १,२७,९७१)
भोर उपविभाग            - ३७९०४
सासवड उपविभाग         - ५१२००
नीरा उपविभाग            - ३८८६७

(Edited by : Sagar Diliprao Shelar)