वीज पुरवठा विस्कळी

वीज पुरवठा विस्कळी
Published on

जांब फीडरवरील वीजपुरवठा विस्कळित

आठ गावांतील पिके पाण्याअभावी धोक्यात

ॲग्रोवन वृत्तसेवा
यवतमाळ : घाटंजी तालुक्यातील पारवा येथील ३३/११ केव्ही उपकेंद्रांतर्गत जांब फीडरवरील शेतीपंपांचा वीजपुरवठा गेल्या चार दिवसांपासून विस्कळित आहे. वारंवार वीज खंडित होणे, ट्रिपिंग आणि कमी दाबाचा वीजपुरवठा यामुळे पिकांना पाणी देणे कठीण झाले असून, सोयाबीन, तूर आणि कापूस पिके पाण्याअभावी कोमेजू लागली आहेत.

जांब फीडरवर कोणतीही पूर्वकल्पना न देता तासन्‌तास वीजपुरवठा बंद राहत असल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. धामणदरी, सगदा, सावंगी, मंगी, भीमकुंड, ठाणेगाव, सावरगाव आणि रामनगर या आठ गावांतील शेतकऱ्यांना या समस्येचा फटका बसत आहे. सावरगाव सर्कलमधील शेतकऱ्यांसमोर ऐन पीकवाढीच्या काळात वीज संकट उभे ठाकले आहे. यंदा पावसाने अपेक्षित साथ न दिल्याने शेतकऱ्यांची भिस्त सिंचनावर आहे. मात्र, वीजपुरवठाच सुरळीत नसल्याने पिकांना वेळेवर पाणी देणे शक्य होत नाही. परिणामी, पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली असून, नुकसान झाल्यास भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

या समस्येकडे महावितरणचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय किसान संघाच्या वतीने उपकार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. गोवर्धन एलटीवार, अरविंद एलटीवार, पांडूरंग बोरकर, अनुप आपनवार, रमेश वाडगुरे, ओमकार जिड्डीवार, गंगय्या आकमवार, अनिल मोहुर्ले, रविंद्र गोविंदवार, राम बलमवार, निखील डब्बलवार, कार्तिक अल्लूरवार, नागरेड्डी निम्मलवार, अरविंद येलटीवार, नवीन कोपुलवार, विजय अडसकर, किशोर चौधरी, बजरंग यनगुनवार आणि बि. एन. चौधरी यावेळी उपस्थित होते.

वीजपुरवठ्याची समस्या तातडीने मार्गी न लागल्यास पारवा येथील उपकेंद्रावर शेतकऱ्यांसह हल्लाबोल ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा भारतीय किसान संघाने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com