प्राधिकरणातील उद्याने उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

पिंपरी - प्राधिकरणाने आकुर्डी मध्यवर्ती सुविधा केंद्रात, तसेच पेठ क्रमांक २६ येथे विकसित केलेली उद्याने उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. 

पिंपरी - प्राधिकरणाने आकुर्डी मध्यवर्ती सुविधा केंद्रात, तसेच पेठ क्रमांक २६ येथे विकसित केलेली उद्याने उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. 

आकुर्डीतील सुमारे पावणेदोन एकरावरील उद्यानात विविध प्रकारची खेळणी बसविण्यात आली आहेत. रोप क्राऊलर, बॅलसिंग ब्रिज, रोप वॉक, जंपर्स अशा प्रकारच्या खेळण्यांचा त्यात समावेश आहे. ‘ॲडव्हेंचर पार्क’च्या धर्तीवर हे उद्यान विकसित करण्यात आले आहे. त्यानुसार जंपर्समध्ये मुलांना उंच उड्या मारता येतील. रोप वॉकमध्ये लोखंडी अँगलला दोरखंड अडकवून जमिनीपासून अँगलपर्यंत चढता येईल. तसेच हर्डल वॉकचीही (टप्प्याटप्प्याने उंच होत जाणारे आडवे लोखंडी अँगल) सोय करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त क्‍लाइंबिंग वॉल, ४०० मीटरचा जॉगिंग ट्रॅकही आहे. उद्यानात आठ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. महिला, पुरुष यांच्यासाठी आधुनिक प्रकारची प्रत्येकी दोन शौचालये बांधण्यात आली आहेत. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी ‘गजिबो’ची सोय आहे. या प्रकल्पासाठी सुमारे दोन कोटी चार लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. 

पेठ क्रमांक २६ मधील वास्तुरचना महाविद्यालयाजवळील ३० गुंठे जागेवर विकसित करण्यात आलेल्या उद्यानामध्ये १५५ मीटरचा जॉगिंग ट्रॅक करण्यात आला आहे. विविध प्रकारची फुलझाडे, शोभेची झाडे लावण्यात आलेली आहेत. मध्यभागी ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी वर्तुळाकार कक्ष उभारण्यात आला आहे. त्याजवळच मुलांना खेळण्यासाठी चौकोनी हौद आहे. मुलांना खेळताना इजा होऊ नये, यासाठी त्यामध्ये वाळू पसरण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ८३ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.

आकुर्डीतील आणि पेठ क्रमांक २६ मधील उद्यानांचे काम पूर्ण झाले आहे. दोन्ही उद्याने महापालिकेकडे हस्तांतर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या तीन-चार दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्या हस्ते या उद्यानांचे उद्‌घाटन करण्यात येईल.
- अनिल सूर्यवंशी,  कार्यकारी अभियंता, प्राधिकरण

Web Title: Pradhikaran Garden

टॅग्स