प्रज्ञाचा अपघात नव्हे घात; पुन्हा चौकशी करण्याची पोलिस अधिक्षकांची ग्वाही

भारत पचंगे
Sunday, 9 August 2020

पाच वर्षांपूर्वी प्रज्ञा नप्तेचा अपघात नव्हे घात
पुन्हा चौकशी करण्याची एसपी पाटील यांची जळगावच्या पाटील परिवाराला ग्वाही

शिक्रापूर : प्रज्ञा प्रशांत नप्ते हिचा अपघात नव्हे तर घातच झाला. हे तब्बल सहा वर्षे पुणे जिल्हा पोलिसांना जळगाव (जि.जळगाव) येथील पाटील कुटुंबीय वारंवार सांगूनही काहीच हालचाल होत नव्हती. मात्र, पोलिस अधिक्षक डॉ.संदीप पाटील यांच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या पहिल्याच भेटीत या प्रकरणाच्या पुन्हा तपासाची ग्वाही तर मिळालीच शिवाय उपविभागिय पोलिस अधिकारी गजानन टोणपे यांचेकडे जावून याबाबत चर्चा करुन पुढील दिशा ठरविण्याची सुचनाही पाटील यांनी केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

मुळ उचंदे, ता. मुक्ताईनगर जळगाव (जि.जळगाव) येथील रतीराम भिकाजी पाटील यांची मोठी मुलगी प्रज्ञा हिचा प्रेमविवाह २ मे २००७ रोजी करंदी (ता. शिरूर, जि.पुणे) येथील प्रशांत कैलास नप्ते यांचेशी झाला. दरम्यान, दोन अपत्ये झालेल्या या दांपत्यांचे कौटुंबिक वाद आणि प्रज्ञाला सासु सास-यांचा त्रास हे पहिल्यापासूनच सुरू होते. याबाबत प्रज्ञा हिने नप्ते कुटुंबाकडून असलेला त्रास, जिवाला धोका हे सर्व एका पत्रासह माहेरच्यांना लेखी स्वरुपात कळवून ठेवले होते.

कोरोनाग्रस्तांसाठी बनवलेल्या रुग्णालयाला आग; ०७ जणांचा मृत्यू

यादरम्यान दि.९ ऑगष्ट २०१४ रोजी मंचर (ता.आंबेगाव, जि.पुणे) येथील रस्ता अपघातात प्रज्ञा तिच्या पतीच्या सोबत दुचाकीवर चाललेले असताना रस्ता अपघात झाला व तिचा मृत्यू झाला. सदर बाब पाटील कुटुंबाला कळविण्यात आली मात्र त्यावेळी कायदेशीर आक्षेप घेवूनही ना पोलिसांनी दाद दिली ना नप्ते परिवाराने. या सर्व तक्रारी असताना पाटील परिवाराचा पाठपूरावा सुरू होता. दरम्यानच्या काळात प्रशांत यांनी जयश्री या केंदूर (ता.शिरूर) येथील युवतीशी दूसरा विवाह केला. मात्र, जयश्री हिला सासू-सासरे, ननंद-नंदावा व पती प्रशांत यांनी त्रास देणे सुरू केले व तिच्या तक्रारीनुसार शिक्रापूर पोलिसांकडे विवाहितेच्या छळाचा गुन्हा दाखल झाला.

दरम्यान, प्रशांत आता तिस-या एका महिलेसोबत राहत असल्याची माहिती जळगाव येथील पाटील परिवाराला समजल्याने त्यांनी दिवंगत प्रज्ञा हिच्या अपघाताची चौकशी पुन्हा करावी म्हणून नेटाने प्रयत्न सुरू केले. याच पार्श्वभूमीवर त्यांनी नुकतीच जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. संदीप पाटील यांची भेट घेतली व सन २००७ ते आज पर्यंतची सर्व माहिती, प्रशांत नप्ते यांची वर्तणूक याची माहिती सांगितली व सन २०१४  मध्ये झालेला अपघात नव्हता तर तो घात होता हे पटवून दिले. या शिवाय त्यावेळीचा प्रज्ञा यांचा व्हिसेरा, शवविच्छेदन अहवाल मिळाले नसल्याची तक्रार केली.

पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी तब्बल वीस मिनीटे आमची सर्व बाजु ऐकून घेतली व उपविभागिय पोलिस अधिकारी गजानन टोणपे यांचेकडे जावून या प्रकरणाची सखोल माहिती त्यांना देण्याची सुचना केली. तसेच, या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याची ग्वाही दिल्याचे दिवंगत प्रज्ञा पाटील यांच्या भगिनी प्रा. प्राजक्ता पाटील यांनी सांगितले. अर्थात बरोबर सहा वर्षांपूर्वी ९ ऑगष्ट रोजीच प्रज्ञा स्वर्गवासी झाली असली तरी सहा वर्षांनी डॉ.पाटील यांनी आम्हाला न्याय देण्यासाठी पुढे केलेला मदतीचा हात प्रज्ञाच्या आत्म्याला शांती देणारा ठरत असल्याचे प्रा. पाटील यांनी सांगितले.

प्रकरण मिटवायला निघालेत गावकारभारी...!
मिटवून घ्या. प्रकरण कशाला वाढवताय? काय-किती रक्कम पाहिजे ती ती एकदाच घ्या आणि सोडून द्या विषयाला. जयश्री नप्ते व दिवंगत प्रज्ञा नप्ते यांच्याशी संबंधित प्रकरणात काही स्थानिक व शेजारील गावातील गावकारभारी आता सक्रीय झाले असल्याची माहिती प्राजक्ता पाटील व जयश्री नप्ते यांच्या काही जवळच्या नातेवाईकांनी दिली. सदर गावकारभा-यांचा हस्तक्षेप पोलिसांना कळविला असून अशा मध्यस्थांची चौकशीही पुढील तपासात होवू शकते असे पोलिस सूत्रांनी सांगितले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pragya Napte accident case file to be reopened SP Sandeep Patil trust to Pragyas relative