
Pune : आंबेगाव तालुका पंचायत समिती गटविकास अधिकारी म्हणून प्रमिला वाळुंज पाटील यांनी पदभार स्वीकारला
मंचर : आंबेगाव तालुका पंचायत समितीत गटविकास अधिकारी म्हणून प्रमिला वाळुंज पाटील यांनी शुक्रवारी (ता.२६) पदभार स्वीकारला. तत्कालीन गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांची राहता (जि.नगर) येथे बदली झाली.
त्यामुळे गेल्या सात महिन्यापासून आंबेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पद रीक्त होते. प्रभारी पदभार अर्चना कोल्हे यांच्याकडे होता. मात्र आता पंचायत समितीला गटविकास अधिकारी म्हणून वाळूंज पाटील लाभल्या आहेत.
यापूर्वी त्यांनी उस्मानाबाद जिल्हा परिषदेत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागात सहायक प्रकल्प अधिकारी, भंडारा जिल्ह्यातील पंचायत समिती पवनी येथे गटविकास अधिकारी म्हणून कामकाज केले आहे.
त्यांच्या कामगिरीमुळे २०२१ मध्ये प्रधानमंत्री आवास योजना व राज्यपुरस्कृत योजना महाविकास अभियान अंतर्गत पवनी तालुक्याचा भंडारा जिल्ह्यात प्रथम व नागपूर विभागात दुसरा क्रमांक आला होता. पवनी तालुक्यात कोरोना काळात उत्कृष्ठ कामकाज, पुरामुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उत्कृष्ट कामकाज व नियोजन केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला होता.
“आंबेगाव तालुका पंचायत समिती अंतर्गत १४२ महसुली गावांमध्ये जलजीवन मिशन, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, घरकुल, शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण विभाग, उमेद महिला स्वयंसहाय्यता गट, नरेगा विषयांत अधिक गतीने व पारदर्शकतेने योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल. गरजू लाभार्थ्यांना अधिक गतीने योजनांचा लाभ देण्यासाठी सतत कार्यरत राहणार आहे.”
प्रमिला वाळुंज पाटील, गटविकास अधिकारी, आंबेगाव तालुका पंचायत समिती, घोडेगाव