जुनी सांगवीमध्ये प्रशांत शितोळेंची बंडखोरी

रमेश मोरे - सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

जुनी सांगवी - प्रभाग क्रमांक ३२ मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रशांत शितोळे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज कायम राहिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला घरच्याच आव्हानाला सामोरे जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या प्रभागात अतुल शितोळे व प्रशांत शितोळे या दोघांमधे तिकीट मिळविण्यासाठी चुरस होती.

जुनी सांगवी - प्रभाग क्रमांक ३२ मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रशांत शितोळे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज कायम राहिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला घरच्याच आव्हानाला सामोरे जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या प्रभागात अतुल शितोळे व प्रशांत शितोळे या दोघांमधे तिकीट मिळविण्यासाठी चुरस होती.

तीन टर्म नगगरसेवकपद भूषविलेले प्रशांत शितोळे यांनी आजवर भाजपच्या आव्हानाला रोखण्याचे काम केले. सुरवातीपासून या प्रभागात भाजपने तगडे आव्हान उभे केले आहे. अखेरच्या दिवसापर्यंत प्रशांत शितोळे की अतुल शितोळे यांना तिकीट दिले जाणार, याची उत्कंठा होती. मात्र ऐनवेळी अतुल शितोळे यांनी बाजी मारल्याने प्रशांत शितोळेसमर्थक गटाने अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. माघारीच्या दिवशी प्रशांत शितोळे उमेदवारी अर्ज माघार घेणार का, हा संपूर्ण सांगवीकरांचा चर्चेचा विषय होता. मात्र त्यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिल्याने या चर्चेला विराम मिळाला. भाजपची या प्रभागातील प्रचाराची मुसंडी पाहता ही बंडखोरी कोणाच्या पथ्यावर पडणार की कोणाला नुकसानकारक ठरणार, हे आगामी काळच ठरवेल; तर दुसऱ्या ओबीसी महिला उमेदवार नीलिमा महेश भागवत यांचेही तिकीट कापल्याने या प्रभागातून त्या अपक्ष लढत आहेत. सांगवी विकास मंच या सामाजिक चळवळीच्या माध्यमातून त्यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली होती. मात्र ऐनवेळी पुन्हा विद्यमान नगरसेविका सुषमा तनपुरे यांना पक्षाकडून संधी दिल्याने भागवत यांचे तिकीट हुकले. या प्रभागात भाजप-राष्ट्रवादी अशी मुख्य लढत होईल, अशी आजवरची परिस्थिती होती. मात्र राष्ट्रवादीतच उभी फूट पडल्याने तिरंगी लढतीचे चित्र या प्रभागात पाहावयास मिळणार असे सध्याचे चित्र आहे.

गत निवडणुकीत सध्याचे भाजप उमेदवार हर्षल ढोरे हे प्रशांत शितोळे यांच्याविरोधात अपक्ष म्हणून उभे होते. यात प्रशांत शितोळे यांना अल्पमताने निसटता विजय मिळाला होता. या वेळी हर्षल ढोरे भाजपकडून लढत आहेत; तर प्रशांत शितोळे अपक्ष लढत आहेत. या प्रभागात भाजपने सुरवातीपासून प्रचाराचे रान उठवले आहे. गत पराभवाची परतफेड होणार का, हा आगामी काळच ठरवेल. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अतुल शितोळे यांच्यापुढे दोघांना रोखण्याचे आव्हान आहे. या प्रभागात मनसे, शिवसेना व संधी हुकलेल्या अपक्ष उमेदवारांनी लढत देण्याचे ठरवल्याने अपक्षांचे बंड पक्षाला डोकेदुखी ठरत आहे. शिवसेनेतही बंड झाल्याने शिवसेनेला बंडखोरांना रोखण्यात अपयश आले आहे. मनसेकडून राजू सावळे हे सर्वसाधारण पुरुष प्रवर्गातून निवडणुक लढवत आहेत. मनसेचे पॅनेल नसल्याने एकला चलो रे... ही मनसेची स्थिती आहे. सावळे यांचा जनसंपर्क दांडगा आहे मात्र मनसेचे पॅनेल नसल्याने उर्वरित तीन मते कोणाच्या पथ्यावर पडणार हा प्रश्न आहे. सध्या अपक्ष उदंड झाल्याने सर्वच पक्षांना बंडखोरीने पोखरले आहे. सुज्ञ मतदार कोणाच्या गळ्यात माळ घालणार हा आगामी काळच ठरवेल.

Web Title: prashant Shitole rebellion