Ujani Dam Incident : उजनीतील दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारी आवश्यक

उजनीच्या किनारपट्टीवरील दुतर्फा होत असलेल्या अवैधरीत्या जलवाहतुकीचा प्रश्न पुन्हा उफाळून आला.
Ujani Dam
Ujani Damesakal

इंदापूर - उजनी जलाशयामध्ये कुगाव ते कळाशी असा प्रवासी जलवाहतुकीचा कोणताही परवाना नसताना, तसेच जलवाहतुकीवेळी आवश्यक सुरक्षेची कोणतीही साधने न पुरवता बेकायदा केलेल्या धोकादायक जलवाहतुकीमध्ये लॉन्च पलटी होऊन झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांसह सहा जणांना आपला जीव गमवावा लागला.

यामुळे उजनीच्या किनारपट्टीवरील दुतर्फा होत असलेल्या अवैधरीत्या जलवाहतुकीचा प्रश्न पुन्हा उफाळून आला असून, बेकायदा जलवाहतूक रोखण्यासाठी प्रशासनाकडून ठोस कार्यवाहीची गरज आहे. या विषयाचा घेतलेला आढावा.

उजनी जलाशयात प्रवासी वाहतूक करण्यासाठी कोणालाच परवाना नाही, तरीही या पट्ट्यातील १४ ठिकाणहून नियमितपणे १६ हून अधिक बोटी (लॉच) प्रवासी वाहतूक करीत असल्याची बाब पुढे आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यापैकी कोणत्याच बोटीवर सुरक्षा साहित्य, जॅकेट ठेवले जात नसल्याची बाब कुगाव आणि कळाशी यासह दुर्दैवी घटना घडली त्या भागात उपस्थित असलेल्या स्थानिक ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधल्यानंतर पुढे आली आहे. यामुळे अशा प्रकारे बेकायदेशीरपणे होत असलेल्या जलवाहतुकीबाबत प्रशासनाने ठोस कार्यवाही करण्याची गरज व्यक्त होत आहे. जेणेकरून अशी दुर्दैवी घटना पुन्हा घडू नये.

धरणातील गाळ बनतोय काळ

उजनी जलायश व पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गाळ साठलेला आहे. सन २०११ मध्ये दिल्ली येथील एजन्सीने केलेल्या सर्वेक्षणानंतर उजनी धरणक्षेत्रात १४ टीएमसी गाळ असल्याचे स्पष्ट केले होते. आज तेच प्रमाण अंदाजे १७ ते १८ टीएमसीपर्यंत पोहोचल्याचा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. गाळामुळे धरणाची पाणी साठवण क्षमता ३२ हून अधिक टीएमसीने कमी झाली आहे.

जर गाळ वेळेत काढला तर धरण व नदीची पाणी साठवण क्षमता वाढण्याबरोबरच जलदुर्घटनांना आळा बसेल. जलदुर्घटनांना कारणीभूत ठरणारा गाळ सध्या तरी काळ बनू पाहत आहे. जलाशयात पोहणारा सराइत जलपटूदेखील या गाळात रुतल्यास जीव वाचविणे अवघड होण्याची भीती आहे. कालच्या दुर्घटनेत गाळात रुतलेल्या राहुल डोंगरे यांनी स्थानिकांनी वेळीच लक्ष देत मदत केल्याने जीवदान मिळाले तर गौरव डोंगरे मात्र गाळाचाच बळी ठरल्याचे जाणकारांमधून बोलले जात आहे.

उजनी जलाशयात पुलाची गरज अधोरेखित

मराठवाड्याला जोडून असलेल्या करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील कुगाव, चिखलठाण, केडगाव, शेटफळ यासह वाड्यावस्तीवरील ग्रामस्थांना पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात जाण्यासाठी रस्त्याच्या मार्गाने तब्बल ८० किलो मीटरचा प्रवास करावा लागतो; पण तोच प्रवास होडीतून जलमार्गे अवघे ४ किलोमीटर अंतर कापल्यानंतर होतो. यामुळे या जलमार्गावर पूल उभारण्याची मागणी होत होती.

या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे इंदापुरातील व्यापारी संघाचे अध्यक्ष भरत शहा व अन्य पदाधिकारी यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे पूल मंजूर झाला असून, तांत्रिक कामाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, बोट उलटण्याच्या घडलेल्या दुर्दैवी घटनेमध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याने या मार्गावर पुलाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

प्रवासी जलवाहतुकीस कोणाची परवानगी

मागील एक दोन वर्षांपूर्वी प्रवासी लाँच चालविण्यास परवानगी मिळावी, या मागणीसाठी एक जणाने इंदापूरमधील पाटबंधारे विभाग कार्यालयाच्या प्रांगणात असणाऱ्या भीमा उपसा सिंचन योजना विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन केले होते. मात्र, तरीही त्याला परवानगी देण्यात आली नव्हती. आता उजनी पाणलोट क्षेत्रातील भीमा नदीच्या दोन्ही तीरांवरून मोठ्या प्रमाणावर सुरू असणाऱ्या लाँच प्रवासी वाहतुकीला कोणाची परवानगी आहे, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

वाहने, जनावरे अन् साहित्याची वाहतूक धोकादायक

नियमाप्रमाणे जलवाहतुकीची परवानगी घेऊन प्रवासी म्हणून केवळ माणसांचा प्रवास होणे अपेक्षित असताना विशेष म्हणजे या लाँचमध्ये लोकांबरोबरच त्यांची दुचाकी वाहने, शेळ्या मेंढ्यासारखी दुभती जनावरे, खरेदी केलेले साहित्य, धान्याची पोती हे अतिरिक्त ओझे ही वाहून नेले जाते. धक्कादायक बाब ही आहे.

१४ ठिकाणांहून १६ लाँचद्वारे होते जलवाहतूक

केतूर ते चांडगाव - ४

वाशिंबे ते गंगावळण - २

चिखलठाण ते पडस्थळ - २

कुगाव से कळाशी - २

कुगाव ते कालठण - ३

ढोकरी ते शहा - १

कुगाव ते शिरसोडी - २

(एक लाँचमधून रोज सरासरी ८ फेऱ्या होतात)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com