नवीन वर्षानिमित्त गोव्याबरोबरच धार्मिक स्थळांना पसंती

नवीन वर्षानिमित्त गोव्याबरोबरच धार्मिक स्थळांना पसंती

पुणे - डिसेंबरची गुलाबी थंडी आणि नवीन वर्षानिमित्त भटकंती करण्यासाठी पर्यटकांचा मोर्चा आता समुद्रकिनारे व धार्मिक स्थळांकडे वळला आहे. शहराच्या जवळची पर्यटन स्थळेदेखील नागरिकांच्या गर्दीने बहरली आहेत. गोव्याला जाण्याचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मोठ्या प्रमाणात वाढल्याचे टूर कंपन्यांकडून सांगण्यात येत आहे.

कोरोना आणि लॉकडाउनमुळे सुमारे नऊ महिने नागरिक पर्यटनासाठी बाहेर पडले नव्हते. मात्र आता पर्यटक मोठ्या संख्येने सुट्यांचा आनंद घेण्यासाठी किनारपट्टी आणि तेथील परिसरात असलेल्या पर्यटनस्थळांना भेट देत आहेत. तर काहींचा कल थंड ठिकाण असलेल्या भागात जाण्यावर आहे. त्यामुळे पर्यटनाने पुन्हा भरारी घेतली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेली काही महिने पर्यटनाच्या अनेक बाबी बंद होत्या. शाळा देखील सुरू नसल्याने आणि ‘वर्क फ्रॉम होम’मुळे घरातच राहणाऱ्या नागरिकांना कंटाळा जाणवू लागला आहे. त्यामुळे मानसिक तणावातही वाढ होत आहे. 

हा मानसिक ताण दूर करण्यासाठी आणि नव्या वातावरणात मूड फ्रेश करण्यासाठी पर्यटनाला प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र गेल्या तीन महिन्यांत पाहायला मिळत आहे. यामध्ये जवळच्या पर्यटन क्षेत्राला पर्यटक भेट देत आहेत. त्याचे मुख्य कारण म्हणजेच शहरातून लांबच्या पर्यटन क्षेत्राकडे जाण्यासाठीची वाहतूक व्यवस्था पूर्वीसारखी सुरळीत झालेली नाही. त्यामुळे स्वतःच्या वाहनांचा वापर करत जवळच फिरण्यास जाण्यास नागरिकांचा पसंती आहे, असे ‘कॅप्टन नीलेश हॉलिडेज’चे नीलेश गायकवाड यांनी सांगितले.

सेल्फ ड्राईव्हला प्राधान्य 
कोरोनाचा सावटाखाली पर्यटनाला बाहेर पडणारे नागरिक सध्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर कमी करत ‘सेल्फ ड्राईव्ह’ला जास्त प्राधान्य देत आहेत. यासाठी विविध ट्रॅव्हल कंपनीकडून गाड्या बुक करून स्वतः या गाड्या चालवून कुटुंब किंवा मित्र परिवारासोबत पर्यटनाला जात आहेत. सार्वजनिक वाहनांचा वापर केल्यास संसर्गाचा धोका वाढू शकतो, अशी भीती नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे स्वतःच्या किंवा भाडेतत्त्वावर गाडी बुक करत पर्यटनाचा आनंद घेतला जात आहे.

लॉकडाउनमुळे माझे वडील आमच्या सोबतच पुण्यात राहत आहेत. दरवर्षी आम्ही पर्यटनासाठी जातो आणि माझे वडील हे धार्मिक स्थळांना भेट देतात. तर, पर्यटन आणि देवदर्शन या दोन्ही गोष्टी होतील या अनुषंगाने सहकुटुंब शिर्डीला जात आहोत.
- प्रशांत गिते, पर्यटक

वन डे ट्रिपला पसंती
पर्यटनासाठी कोरोनाची चाचणी संदर्भातील नियम कडक नसलेल्या, संसर्गाचे प्रमाण कमी असलेल्या तसेच एका दिवसात पर्यटन करता येईल, अशा पर्यटनस्थळांची निवड सध्या पर्यटकांकडून करण्यात येत आहे. यामध्ये, महाबळेश्‍वर, शिर्डी, बादामी, हंपी, मुरूडेश्‍वर, अंबा, दांडेलीसारख्या स्थळांची निवड केली जात आहे. तर गेल्या तीन महिन्यांत दोन हजारांहून अधिक पर्यटकांनी गोव्याला भेट दिल्याचे गो हॉलिडेजचे मकरंद अनगळ यांनी सांगितले.

येणाऱ्या वर्षाचे उत्साहात स्वागत करण्यासाठी व कंटाळा दूर करण्यासाठी नागरिक पर्यटनाला देशाबाहेर मालदीवला, तर देशांतर्गत केरळ, राजस्थान तसेच हळूहळू धार्मिक स्थळे सुरू झाल्याने सेल्फ ड्राईव्हच्या माध्यमातून या स्थळांना भेट देत आहेत.  
- अखिलेश जोशी, संचालक, गिरीकंद ट्रॅव्हल्स प्रा. लि. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com