MPSCने कसली कंबर; नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या परीक्षांसाठीची तयारी अंतिम टप्प्यात!

ब्रिजमोहन पाटील
Monday, 12 October 2020

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा व दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब या परीक्षांची तयारी पूर्ण झाली आहे.

पुणे- महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा व दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब या परीक्षांची तयारी पूर्ण झाली आहे. तब्बल 4 लाख 40 हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. वेळापत्रकाप्रमाणे या परीक्षा पार पाडण्यासाठीची प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात पोहली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर स्थगिती आणली आहे, त्यामुळे या प्रवर्गातून अर्ज भरलेल्या उमेदवारांचे काय होणार याचे उत्तर राज्य सरकारला देता न आल्याने 11 ऑक्‍टोबर रोजची परीक्षा पुढे ढकलली आहे. आता 1 नोव्हेंबर रोजी अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा आणि 22 नोव्हेंबर रोजी दुय्यम सेवा अराजपत्रित "गट ब'ची परीक्षा राज्यात होणार आहे. या दोन्ही परीक्षेसाठी 4 लाख 40 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत.

न्यूज चॅनेल विरोधात बॉलिवूड गेले कोर्टात; बदनामी केल्याचा आरोप

न्यायालयाने 9 सप्टेंबर रोजी आरक्षणावर स्थगिती आणल्यानंतर 16 सप्टेंबर रोजी "एमपीएससी'ने राज्य सरकारला पत्र लिहिले होते. त्यामध्ये राज्य सेवा परीक्षा, अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा व दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब या तीन परीक्षांबाबत काय धोरण आहे याची विचारणा केली होती. त्यावर राज्य सरकारकडून लवकर निर्णय घेतला नाही, अखेर राज्य सेवा पूर्व परीक्षेला 72 तास शिल्लक असताना परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

"आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, "आम्ही तिन्हीही परीक्षांबाबत सरकारकडे विचारणा केली, पण त्यांनी केवळ एकाच परीक्षेबाबत निर्णय घेतला. नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या दोन्ही परीक्षांसाठीचे परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था यासह कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवरील खबरदारी अशी तयारी पूर्ण झाली आहे. जर सरकारने या परीक्षेबाबत आम्हाला काही सूचना न दिल्यास ठरलेल्या वेळापत्रका प्रमाणे परीक्षा घेतली जाईल.''

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Preparations for the MPSC exam in November are in the final stages