‘प्रेरणापथ’ने दिली त्यांना जगण्याची प्रेरणा

वाल्हेकरवाडी, चिंचवड - प्रकाश सोनवणे यांच्या पत्नीकडून पादत्राणे खरेदी करताना श्रीकांत भारतीय. या वेळी डावीकडून अमित गोरखे, सोनवणे व एकनाथ पवार.
वाल्हेकरवाडी, चिंचवड - प्रकाश सोनवणे यांच्या पत्नीकडून पादत्राणे खरेदी करताना श्रीकांत भारतीय. या वेळी डावीकडून अमित गोरखे, सोनवणे व एकनाथ पवार.

पिंपरी - येरवडा कारागृहातून सुटका झाली; पण पुढे उभा ठाकला जगण्याचा प्रश्‍न. उतारवयात नोकरीही मिळेना. अशावेळी त्या ज्येष्ठ जोडप्यामागे उभ्या राहिल्या ‘प्रेरणापथ’ या प्रकल्पातील संस्था. त्यांनी सामाजिक बांधिलकीतून वाल्हेकरवाडीमध्ये त्या दांपत्याला पादत्राणे विक्रीचे दुकान सुरू करून दिले.  

प्रकाश सखाराम सोनवणे यांचे पुनर्वसन अशा पद्धतीने झाले. मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी श्रीकांत भारतीय यांच्या हस्ते या दुकानाचे गुरुवारी (ता. २७) उद्‌घाटन झाले. तेच या दुकानाचे पहिले ग्राहकही ठरले. सोनवणे यांच्या पत्नीच्या हस्ते भारतीय यांनी या दुकानात खरेदी केली. 

प्रकाश सोनवणे १९७५ मध्ये मशिनिस्ट म्हणून बजाज टेम्पो कंपनीत नोकरीला लागले. मात्र, एका गुन्ह्यात त्यांना अटक झाली. त्यामध्ये आठ वर्षे शिक्षा भोगून ते बाहेर पडले. दरम्यानच्या काळात वडगाव मावळमधील त्यांचे पादत्राणांचे दुकान व घरही रस्ता रुंदीकरणात गेले होते. त्यानंतर कोणीही नोकरी देईना. वयाची साठी उलटलेली. त्यामुळे त्यांच्यापुढे चरितार्थाचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला. आयुष्यात झालेली चूक सुधारण्याची संधी हवी असलेल्या त्यांच्या मदतीसाठी धावून गेला तो ‘प्रेरणापथ’ प्रकल्प. 
उपमहापौर सचिन चिंचवडे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, भोई प्रतिष्ठानचे डॉ. मिलिंद भोई, आदर्श मित्र मंडळाचे उदय जगताप, सहायक पोलिस आयुक्त सतीश पाटील, नोव्हेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अमित गोरखे, नगरसेविका अनुराधा गोरखे, नगरसेवक नामदेव ढाके, शीतल शिंदे, पोलिस निरीक्षक प्रभाकर शिंदे, ॲड. प्रताप परदेशी यांनी वाल्हेकरवाडीतील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावली.

भारतीय म्हणाले, ‘‘भोई प्रतिष्ठानच्या या उपक्रमामुळे इतरांना प्रेरणा मिळते. सरकारी अधिकाऱ्यांनाही चांगली प्रेरणा, ऊर्जा मिळते. घराच्या उंबरठ्याबाहेर असे उपक्रम आले पाहिजेत. सोनवणे यांचा छोटासा उपक्रम प्रेरणादायी आहे. त्यांचे दुकान हे केवळ दुकान नसून प्रेरणाकेंद्र आहे.’’ 

पवार म्हणाले, ‘‘सामाजिक बांधिलकीतून करण्यात आलेला हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. सोनवणे यांना कोणतीही अडचण आली, तर त्यांनी या भागातील नगरसेवकांशी संपर्क साधावा. आम्ही त्यांच्या अडचणी सोडवू. अशाच पद्धतीने आणखी काही जणांचे पुनर्वसन करावयाचे असल्यास आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू.’’ डॉ. भोई यांनी प्रास्ताविक केले.

असा आहे प्रकल्प
महाराष्ट्र कारागृह प्रशासन, पुण्यातील भोई प्रतिष्ठान, आदर्श मित्र मंडळ यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या ‘प्रेरणापथ’ प्रकल्पांतर्गत सोनवणे यांना वाल्हेकरवाडीला दुकान सुरू करून देण्यात आले. गेले दोन वर्षे सुरू असलेल्या या प्रकल्पांतर्गत दरमहा कारागृहात कार्यक्रम आयोजिले जातात. कारागृहातून बाहेर पडल्यानंतर कैद्यांनी चांगले काम करावे, यासाठी त्यांना मदत करण्याच्या हेतूने या कार्यक्रमातून मार्गदर्शन केले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com