पारगावात चार बिबटे सीसीटिव्हीत कैद ; ग्रामस्थ झाले भयभीत

रमेश वत्रे
Saturday, 9 January 2021

पारगाव हे भीमा नदीच्याकडेला वसलेले गाव आहे. त्यामुळे या भागात उसाची शेती मोठ्या प्रमाणात आहे. सध्या ऊस तोडणी सुरू असल्याने बिबटे सैरभैर झाले आहेत.

केडगाव (पुणे) : पारगाव ( ता.दौंड ) येथे चार बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दिलीप होले यांच्या सीसीटिव्ही कॅमे-यात हे चार बिबटे दिसत आहेत. वन विभागाने तातडीने पिंजरा लावण्याची मागणी होत आहे. गेल्या वर्षभरात पारगावातच तीन बिबटे पकडले आहेत.

पारगावमधील दिलीप होले यांच्या फॅार्म हाऊसमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे आहेत. शनिवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास कुत्रे भुंकू लागल्याने होले जागे झाले तेव्हा त्यांच्या घराच्या अंगणात चार बिबटे वावरत असल्याचे दिसून आले. या प्रकाराने होले कुटुंबीय भयभीत झाले आहे. सुदैवाने होले यांच्या गोठ्यातील म्हशीवर बिबट्यांचे लक्ष न गेल्याने ती वाचली.

पुण्याच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा

पारगाव हे भीमा नदीच्याकडेला वसलेले गाव आहे. त्यामुळे या भागात उसाची शेती मोठ्या प्रमाणात आहे. सध्या ऊस तोडणी सुरू असल्याने बिबटे सैरभैर झाले आहेत. दडण कमी झाल्याने बिबटे लोकवस्तीत येऊ लागले आहेत. ग्रामस्थांच्या तोंडी सांगण्यावर वन विभाग विश्वास ठेवत नाही. मात्र सीसीटिव्ही   कॅमे-यात चार बिबटे कैद झाल्याने या भागात चार किंवा त्यापेक्षा जास्त संख्येने बिबटे असल्याचे निश्चित झाले आहे. या सीसीटिव्हीची वन विभागाने दखल घेऊन तातडीने या भागात पिंजरा लावावा अशी मागणी होत आहे. दिवसा भारनियमन असल्याने शेतकरी रात्रीचे शेतीला पाणी देऊ शकत नाही. शेतमजूर कामावर येत नाही. आले तर त्यांना संरक्षण द्यावे लागत आहे, अशा तक्रारी आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
  
याबाबत सरपंच जयश्री ताकवणे म्हणाल्या, वन विभागाकडे अनेकदा मागणी करून सुद्धा पिंजरे लावले जात नाही. या बिबट्यांनी गावातील कुत्री, शेळ्या, जनावरे खाल्ली आहेत. शेतात मजूर कामाला येत नाही. शेतीला पाणी देणे अवघड झाले आहे.

अतुल ताकवणे म्हणाले, पिंज-याबाबत वन विभाग हा खूप कारणे देत आहेत. नुकसान भरपाईसाठी खूप कागदपत्रांची मागणी असते. 

तुषार दिलीप होले म्हणाले, पहाटे पावणे चार वाजता चार बिबटे आत आले. ते नऊ मिनिटे घरासमोर होते. वन विभागाच्या कर्मचा-यांनी येऊन सीसीटिव्हीची पाहणी केली असून तातडीने पिंजरा लावला जाईल, असे त्यांनी सांगितले.    
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The presence of four leopards in pargaon has created an atmosphere of fear among the villagers