एटीएस पुणे युनिटमधील जांभळे, चिंचकर यांना राष्ट्रपती पदक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 जानेवारी 2020

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) पुणे युनिटमधील सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रदीप हरिश्‍चंद्र जांभळे  तसेच ग्रामीण पोलिस दलातील सहायक पोलिस उपनिरीक्षक दशरथ बाबूराव चिंचकर यांना पोलिस दलामध्ये गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे.

पुणे - महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) पुणे युनिटमधील सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रदीप हरिश्‍चंद्र जांभळे तसेच ग्रामीण पोलिस दलातील सहायक पोलिस उपनिरीक्षक दशरथ बाबूराव चिंचकर यांना पोलिस दलामध्ये गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले आहे.

जांभळे यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर वचक बसविण्याबरोबरच पाकिस्तानला माहिती पुरविणाऱ्यांना पकडून देण्याची कामगिरी केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जांभळे यांनी आपल्या ३२ वर्षांच्या सेवेत बहुतांश सेवा पुणे पोलिस दलामध्ये बजावली आहे. त्यांनी शहरातील कुख्यात गुन्हेगारांच्या टोळ्यांच्या प्रमुखांसह अनेकांना अटक करण्यामध्ये भूमिका बजावली होती. याबरोबरच अपहरण, वाहनचोरीच्या प्रकरणांचा शोध घेऊन सराईत गुन्हेगारांना पकडले आहे. त्यांनी ५२ लाखांची अमली पदार्थ जप्त केले होते. बांगलादेशी घुसखोरांना शोधण्यात त्‍यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, असे ‘एटीएस’चे साहाय्यक पोलिस आयुक्त विक्रम देशमाने यांनी सांगितले.

पुण्यात देशातील सर्वांत उंच बिल्डींगवर फडकणार 'तिरंगा'!

चिंचकर यांनी ग्रामीण पोलिस दलाच्या विविध विभागांमध्ये ३३ वर्षे सेवा बजावली आहे. १९८६ साली ते पोलिस दलामध्ये भरती झाले. १९९१ मध्ये चोरीस गेलेल्या जेजुरीतील खंडोबाच्या चांदीच्या पाच मूर्तींचा शोध घेण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी त्यांनी बजावली. 

याबरोबरच दरोडे, चोरीच्या गुन्ह्यांतील १८ आरोपींसह सराईत गुन्हेगार मन्नावत यास त्यांनी बेड्या ठोकल्या होत्या. २००१ मध्ये दरोडा टाकून खून केल्याच्या प्रकरणातील आरोपींना अटक करून त्यांच्याकडून १५ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला होता. 

याबरोबरच २००५ मधील मुसळधार पावसामुळे उद्‌भवलेल्या पूरजन्य परिस्थितीमध्ये त्यांनी अनेकांचे प्राण वाचविले होते. याबरोबरच जातीय दंगलीमध्येही त्यांनी उत्तम पद्धतीने तपास केला होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये कार्यरत असताना त्यांनी ७४ ठिकाणी लाच घेणाऱ्यांना अटक केली. त्यांनी आत्तापर्यंत ३७९ रिवॉर्डस प्राप्त केले आहेत. चिंचकर सध्या पोलिस मुख्यालयात कार्यरत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: president award to pradip jambhale and dashrath chinchkar