बाबासाहेबांच्या कार्याचा रमाईच पाया - राष्ट्रपती कोविंद 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

रमाई यांचा उत्तर प्रदेशात पुतळा आहे; मात्र तो पूर्णाकृती नाही. त्यामुळे देशातील पहिला पूर्णाकृती पुतळा पुण्यात साकारला, ही आनंदाची बाब आहे. 
- रामनाथ कोविंद, राष्ट्रपती 

पुणे - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात त्यांच्या पत्नी रमाई यांचे योगदान खूप मोठे होते. बाबासाहेबांच्या कार्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा होऊ नये, यासाठी रमाई यांनी अखेरच्या श्‍वासापर्यंत साथ दिली. डॉ. बाबासाहेबांच्या कार्याच्या इमारतीचा खरा पाया रमाई याच होत्या, या शब्दांत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रमाई आंबेडकरांचा बुधवारी गौरव केला. 

महापालिकेच्या वतीने पुणे रेल्वे स्थानक परिसरातील मातोश्री रमाई भीमराव आंबेडकर उद्यानात उभारण्यात आलेल्या रमाई यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राष्ट्रपतींच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. राज्यपाल सी. विद्यासागर राव, महापौर मुक्ता टिळक, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्यायराज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदामंत्री विजय शिवतारे, खासदार अनिल शिरोळे, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले या वेळी उपस्थित होते. 

कोविंद म्हणाले,""रमाईंच्या व्यक्तिमत्त्वाची उंची मोठी आहे. बाबासाहेबांना साथ देऊन त्यांनी त्यांच्या कार्याला हातभार लावला. कठीण परिस्थितीत कोणीची साथ नसताना रमाई या बाबासाहेबांच्या पाठीशी होत्या. त्यामुळेच बाबासाहेबांनी भारतीय महिलांना त्यांचा अधिकार मिळावा म्हणून जोरदार प्रयत्न केले आणि त्यात यशही आले. त्याचे प्रतिबिंब संविधानात उमटले आहे. संविधानाने भारतीय महिलांना समान अधिकार व हक्क दिले आहेत.'' महापालिकेने रमाईंचा पुतळा उभारून न्याय दिला असून, हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे आठवले यांनी सांगितले. 

Web Title: President inaugurated the statue of Ramai Bhimrao Ambedkar in pune