लॉकडाऊननंतर घरांच्या किमती होणार का कमी? तर...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 May 2020

किंमती कमी होण्याची शक्यता धूसरच....

बारामती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बदलत्या स्थितीमुळे बारामतीत घर खरेदी करणा-यांसाठी सुवर्णसंधी असल्याची माहिती येथील बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया बारामती शाखेचे अध्यक्ष दीपक काटे यांनी दिली. तसेच लॉकडाऊनमुळे घराच्या किंमती कमी होतील अशी अजिबात शक्यता नाही, असेही ते म्हणाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केंद्राने अडचणीतील बांधकाम क्षेत्रासह पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूदीची घोषणा केली आहे. बांधकाम व्यावसायिक संघटनेच्या वतीनेही विविध मागण्या करण्यात आल्या होत्या. यापैकी काही मागण्या मान्य झाल्याचे काटे यांनी नमूद केले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ते म्हणाले, केंद्राने 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केल्यानंतर सर्वांचे त्याकडे लक्ष होते. यात बांधकामाच्या दृष्टीने काही महत्वाच्या बाबींचा समावेश आहे. 

महारेरामध्ये प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचे मंजूर केलेले आहे. केंद्राच्या पॅकेजमध्ये प्रधानमंत्री आवास योजेनेचे 2 लाख 60 हजारांचे अनुदान मिळविण्यासाठी 31 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठी केंद्राकडून 70000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ग्राहकांना नव्याने घर घेण्याची ही संधी असून ज्यांना घरखरेदी करायचे आहे त्यांनी या बाबत वेळेत योग्य निर्णय घेणे अपेक्षित आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

किंमती कमी होण्याची शक्यता धूसरच....

लॉकडाऊनमुळे घराच्या किंमती कमी होतील अशी अजिबात शक्यता नाही. कारण या काळात सिमेंट, स्टील या बाबींची मागणी कमी प्रमाणात असताना दरवाढ झालेली आहे. मजूरांचे स्थलांतर झालेले असल्याने प्रकल्प लांबले तर खर्चातही वाढ होऊ शकते, या बाबी विचारात घेता घरांच्या किमती कमी होण्याची शक्यता धूसर आहे, असेही काटे यांनी नमूद केले.  

ग्राहकांना चांगली संधी...

या काळात घरखरेदी ही ग्राहकांना चांगली संधी आहे. ग्रामीण भागात आपल हक्काच घर असावं ही भावना कोरोनामुळे दृढ होईल, त्यामुळे बारामतीत सदनिकांना मागणी वाढेल, असे वाटते. सर्वच मटेरियलच्या किंमतीत भरमसाठ वाढ झालेली असल्याने घरांच्या किंमती कमी होण्याची फार शक्यता नाही. मागणीच्या तुलनेत तयार सदनिकांची संख्याही मर्यादीत असल्यानेही भावावर परिणाम होणार नाही. केंद्राने प्रधानमंत्री आवास योजनेची मुदत वाढवल्याने त्याचा लाभ ग्राहकांनी घ्यायला हवा.

– सुरेंद्र भोईटे, अध्यक्ष, क्रेडाई, बारामती. 

घरात राहून घराच महत्व समजल. स्वत:च घर असावं आणि ते प्रशस्त असावं हे आता लॉकडाऊननंतर अनेकांच्या लक्षात आले. भविष्यात गृहकर्जावरील व्याजदरातही कपात होईल. त्यामुळे घरखरेदीसाठी ही योग्य वेळ आहे. प्रथमच घरात इतक्या वेळ राहण्याची वेळ अनेकांवर आल्यानंतर आता मोठ्या घराची संकल्पना ग्रामीण भागातही अधिक रुजेल, असा अंदाज आहे. घरांच्या किंमतीमध्ये घट होण्याची शक्यता नाही, त्यामुळे ज्यांनी घर घेण्याचे नियोजन केलेले आहे, त्यांनी त्या दृष्टीने आता खरेदीची प्रक्रिया सुरु करावी.

- संजय संघवी, बांधकाम व्यावसायिक, बारामती. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prices of Homes will not reduce after lock down says Deepak Kate