गुरुजींची मोटारच झाली मोफत स्कूल व्हॅन

Studant1234
Studant1234

बारामती ः मराठी शाळा कात टाकताहेत हे चित्र गेल्या काही वर्षांत दिसतेच आहे. पण ही कात टाकून त्या अधिक लोकोपयोगी बनताहेत, यामागे तेथील हाडाचे शिक्षक कारणीभूत आहेत. बारामती तालुक्‍यातील नीरावागज व लिमटेक येथील दोन शाळांमध्ये तर शिक्षकांनी स्वतःचीच मोटार स्कूल बस म्हणून मुलांना शाळेत ने-आण करण्यासाठी वापरली आहे. ज्यामुळे शालाबाह्य मुले शाळेच्या प्रवाहात दाखल झाली आहेत.

सरकारी शाळेतील गुरुजी हे सरांपेक्षा जवळचे वाटतात. आज जरी जिल्हा परिषदेचे शिक्षकही "सर' बनले असले, तरी हे उदाहरणे म्हणजे सरकारी शाळांमध्ये तळमळीचे शिक्षक असतील तर काहीही घडू शकते, अन्‌ मुलांना याच शाळा खासगीच्या कितीतरी पटीने अधिक जवळच्या वाटतात याचीच प्रचिती देतात.

बारामती तालुक्‍यातील पन्हाळेवस्ती (नीरावागज) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विलास काटे व सविता रणदिवे हे शिक्षक दांपत्य सेवेत आहेत. त्यांच्या आपुलकीने शिकविण्याची पद्धत पाहून बारामती शहरानजीकच्या दहा कुटुंबांनी त्यांच्याकडेच मुलांना प्रवेश घेण्याचे ठरवले. काटे हेही बारामतीत राहतात. मग त्यांनी ही दहा मुले पन्हाळेवस्ती शाळेत दाखल करून घेतली. या मुलांना ते दररोज घरून निघतानाच त्यांच्या गाडीत घेऊन जातात. येताना स्वतःच्याच गाडीत आणतात. दररोजचा 12 किलोमीटरचा प्रवास मुलांना छान आणि पालकांना निर्धोक वाटतो. या मुलांना खाऊ, शालेय वह्या, गणवेश देखील हे दांपत्यच स्वखर्चाने घेते. विलास काटे यांनी याअगोदरही सणसर (ता. इंदापूर) येथील रायतेमळा शाळेत स्वखर्चातून तालुक्‍यातील सर्वाधिक कृतीयुक्त अध्यापनाचे साहित्य तयार केले होते.

लिमटेक (ता. बारामती) येथे जिल्हा परिषदेच्या शाळेचे मुख्याध्यापक बजरंग जाधव हे पिंपळी नजीकच्या भागातून मजुरीसाठी आलेल्या उस्मानाबाद, अकोला जिल्ह्यांतील दहा मुलांना स्वतःच्या गाडीत घेऊन येतात व संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर पुन्हा सुखरूप पोच करतात. ही मुले स्वतःहून इतक्‍या लांब येऊ शकणार नाहीत, ती आली नाहीत, तर ती शाळाबाह्यच राहतील, त्यामुळे त्यांचे शिक्षण राहू नये यासाठी हा प्रपंच जाधव हे करीत असतात. प्रभारी गटशिक्षणाधिकारी संजय जाधव, डोर्लेवाडी केंद्रप्रमुख जयश्री झाडबुके, माजी सरपंच रमेश ढवाण, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप देवकाते यांचे त्यांना सहकार्य असल्याने हे काम आपण करू शकल्याचे जाधव सांगतात. आता तर शिक्षकांनी मिळून 60 हजार खर्चून एक व्हॅन घेतली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com