esakal | दहावीत विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्यांना पाच हजार रुपयांचे बक्षीस
sakal

बोलून बातमी शोधा

Exam

दहावीत विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्यांना पाच हजार रुपयांचे बक्षीस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : इयत्ता बारावीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या मुलींबरोबरच आता दहावीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या मुलींनाही प्रत्येकी पाच हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्याचा निर्णय पुणे जिल्हा परिषदेने घेतला आहे.

या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या मुलींच्या बॅंक खात्यावर त्यांच्या बक्षीसाची रक्कम जमा केली जाणार आहे. जिल्हा परिषदेने मागील वर्षीच्या शैक्षणिक वर्षापासून गुणवंत मुलींसाठी ही बक्षीस योजना सुरू केली आहे. परंतु गेल्या वर्षी केवळ बारावीच्या वर्गातील मुलींपुरतीच ही योजना मर्यादित होती. या योजनेत बदल करून, त्यात दहावीच्या वर्गातील मुलींचा समावेश करण्यासाठी जिल्हा परिषदेने राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षापासून दहावी आणि बारावी अशा दोन्ही वर्गात विशेष प्रावीण्य मिळविलेल्या मुलींना याचा लाभ घेता येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रेय मुंडे यांनी सांगितले.

हेही वाचा: ‘आयटीआय’ची अंतिम गुणवत्ता यादी ४ सप्टेंबरला होणार जाहीर

जिल्हा परिषदेने गेल्या वर्षी या योजनेसाठी १५ लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली होती. प्रत्यक्षात यापैकी सुमारे सात लाख रुपयांचाच निधी या योजनेवर खर्च झाला होता. यानुसार केवळ १४० मुलींना लाभ मिळाला होता. दरम्यान, यंदा या निधीत आणखी १० लाख रुपयांची वाढ करत, तो २५ लाख रुपये करण्यात आला आहे. याशिवाय पुरवणी अर्थसंकल्पात आणखी २५ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्याचे नियोजन केले आहे.

अर्थसंकल्पात २५ लाखांची तरतूद

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाची ही योजना असून, यासाठी चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात २५ लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी, बारावीच्या निकालात किमान ८० टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळविणाऱ्या मुलींची माहिती मागवण्यात आली आहे.

योजनेचा लाभ देण्यासाठी दहावी, बारावीत विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या मुलींची गावनिहाय नावे, पत्ता, वर्ग, परीक्षेत मिळालेले गुण आणि संबंधित मुलीच्या बँक खात्याची माहिती मागविण्यात आली आहे. ही माहिती जमा झाल्यानंतर लगेचच हे पैसै पात्र मुलींच्या खात्यात जमा केले जाणार आहेत.

- दत्तात्रेय मुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद

loading image
go to top