उपमुख्यमंत्री अजित पवारांचा एक घाव अन् दोन तुकडे; पुण्याचा प्रश्न लागला मार्गी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 17 January 2021

-सरहद चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार.

-कात्रज डेअरीतून होणार २४मीटरचा भव्य रस्ता; जागा हस्तांतराचा प्रश्न मार्गी.

कात्रज  : सरहद चौकातून कात्रज डेअरीमधून वंडरसिटीकडे जाणारा २४ मीटरच्या जागा हस्तांतराचा प्रश्न मार्गी लागल्याने भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.  विकास आराखड्यातील डीपी रस्त्याच्या जागा हस्तांतराचा प्रश्न मार्गी लागल्याने राजाराम गॅस एजन्सीजवळ होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे. मागील २० वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित होता.

काळी जादू,करणी झाल्याचे सांगत पावने तीन लाख उकळले; एकास अटक

या पार्श्वभूमीवर स्थानिक नगरसेवक युवराज बेलदरे यांनी महापालिका प्रशासन व कात्रज दूध संघ प्रतिनीधींची पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घडवून आणली. त्यानंतर दूध संघाच्या मागण्यांबाबत समन्वयातून तोडगा निघाल्याने अनेक वर्ष रखडलेल्या डीपी रस्ता विकसनासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे लवकरच रस्त्याचे विकसन करण्यात येणार आहे.

वंडरसिटीसह त्रिमुर्ती रेसिडेंसी, चिंतामणी रेसिडेंसी, श्रीदत्त अपार्टमेंट, प्रथमेश अपार्टमेंट, चंद्राई स्पंदन आदी सोसायट्यांसह त्रिमुर्ती चौकाकडून कात्रज चौकाकडे जाणाऱ्या वाहतूकदारांसाठी हे सोयीचे ठरणार आहे. रस्ता विकसित करताना कात्रज दूधसंघाच्या ४५ गुंठे जमीनीसह सुरक्षाभिंत, कामगार कोठ्या व मिल्क पार्लर बाधित होत होते. बाधित होणाऱ्या गोष्टी महापालिकेने बांधून द्याव्यात ही दूध संघाची मागणी होती. तसा प्रस्ताव मनपाकडे देण्यात आला होता. त्यानुसार, अजित पवारांच्या उपस्थितीत हा प्रस्ताव महापालिकेने मंजूर केल्याने जागा हस्तांतरित करण्याचे संघाकडून मान्य करण्यात आले. दूधसंघ आणि महापालिका प्रशासन यांच्यात झालेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह मनपा आयुक्त विक्रम कुमार, नगरसेवक बेलदरे, दूधसंघाचे चेअरमन विष्णू हिंगे, व्यवस्थापकीय संचालक डॉ. विवेक क्षीरसागर, शहर अभियंता प्रशांत वाघमारे उपस्थित होते.

काळी जादू,करणी झाल्याचे सांगत पावने तीन लाख उकळले; एकास अटक

वाहतूक कोंडीचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता. गेल्या ४ वर्षांपासून मी जागा हस्तांतरासाठी पाठपुरावा करत होतो. त्यास उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मध्यस्थीने यश मिळाले. येत्या अर्थसंकल्पात निधीसह मंजुरी घेऊन लवकर काम सुरु व्हावे यासाठी प्रयत्न राहील -युवराज बेलदरे, स्थानिक नगरसेवक

डीपी रस्ता विकसित झाल्यास वाहतूक कोंडी होणार नाही. सध्या सरहद चौकात होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त आहेत. जागा हस्तांतरणाचा प्रश्न मार्गी लागल्याने मोठे समाधान आहे. आता लवकरात लवकर हा रस्ता विकसित होऊन नागरिकांना होत असलेल्या त्रासापासून सुटका व्हावी -राजाराम वीर, स्थानिक नागरिक

(संपादन : सागर डी. शेलार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the problem of traffic congestion at sarhad chowk will be solve