परप्रांतीय मजुरांचा वनवास संपता संपेना... 

workers11
workers11

पारगाव (पुणे) : कोरोनो विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे सुमारे दीड महिन्यापासून लाखो परप्रांतीय मजुरांच्या हाताला काम नसल्याने उपासमार होऊ लागली आहे. हे मजूर पायी गावाकडे निघाले आहे. परंतु, रस्त्यावर असलेल्या तपासणी नाक्‍यावर पोलिस त्यांना अडवून वाहनात बसवून आलेल्या ठिकाणी पुन्हा नेऊन सोडत असल्याने त्यांनी दिवसभरात भर उन्हात 15 ते 20 किलोमीटर केलेली पायपीट वाया जात आहे. त्यांची ही परवड थांबणार कधी सरकार मजुरांच्या या प्रश्नावर गांभीर्याने पाहणार कधी असा सवाल उपस्थित होत आहे. 

कोरोनो विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. शहरी भागालगतच्या कंपन्या बंद आहेत. हातावर पोट असणाऱ्यांचे रोजगार गेल्याने त्यांची उपासमार होऊ लागली आहे. लॉकडाऊन सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी लोटल्याने या मजुरांचा संयम सुटू लागला आहे. संघटित असलेल्या कामगारांनी सरकारकडे नोंदणी केल्यानंतर काही शहरात कामगारांना मूळगावी जाण्यासाठी रेल्वे व बसची सुविधा उपलब्ध झाली आहे. परंतु ती साधणे अपुरी पडत असल्याने हजारो परप्रांतीय मजूर पायीच गावी निघाले आहेत. 

पुणे- नाशिक महामार्गावर दर एक किलोमीटरच्या अंतरावर 10 ते 20 मजुरांचा तांडा भर उन्हात पाठीवर, हातात सामान घेऊन गावाकडे निघाल्याचे विदारक दृष्य पाहायला मिळत आहे. यामध्ये महिला, लहान मुले आहेत. काहींच्या पायात साधी चप्पलही नाही. गेल्या आठवडाभरापासून आंबेगाव तालुक्‍याच्या हद्दीतून गेलेल्या पुणे-नाशिक महामार्गावरून झारखंड, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड या राज्यातील मजूर जाताना दिसत आहे. रस्त्यावरील सर्वच हॉटेल बंद असल्याने कोणी काही खायला दिले तर एक वेळेचा जेवणाचा प्रश्न सुटत आहे. नाहीतर मिळेल ते खाऊन गावाकडे त्यांची कूच सुरू असते. 

छत्तीसगडला जाणाऱ्या दहा ते वीस मजुरांना मंचर बसस्थानका जवळील तपासणी नाक्‍यावर अडवून पोलिसांनी टेंपोमध्ये बसवून पुन्हा वीस किलोमीटर अंतरावरील खेड तालुक्‍याच्या हद्दीवर नेऊन सोडण्यास सांगितले. परंतु सदर टेंपोचालकाने त्या मजूरांना पाच किलोमीटर अंतरापर्यंत नेऊन रस्त्यावर उतरवून दिले. यामुळे दिवसभर उन्हात पायपीट केलेली वाया जात आहे. ही बाब मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे यांना समजल्यानंतर त्यांच्या जेवणाची व नाश्‍त्याची व्यवस्था केली. 


पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

दिवसभर 15 ते 20 किलोमीटर पायी चालायचे पोलिसांची नजर पडली की पुन्हा परत सकाळी निघालेल्या ठिकाणी सोडले जाणार ही मजुरांची ससेहोलपट सुरू आहे. अशाच प्रकारे कनेरसर (ता. आंबेगाव) येथून उत्तर प्रदेशात पायी निघालेल्या मजुरांना बेल्हे (ता. जुन्नर) येथील तपासणी नाक्‍यावर पोलिसांनी अडवून आंबेगावच्या हद्दीत आणून सोडले.

रात्रभर डोंगरावर राहून सकाळी खडकवाडीत हे मजूर आले असता येथील सरपंच अनिल डोके यांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी त्या मजुरांना नाष्टा व पाणी देऊन कनेरसर येथे जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था केली. 

याबाबत मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे म्हणाले, "आमच्या हद्दीत आलेल्या मजुरांना माणुसकीच्या भावनेतून स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने त्यांना जेवण देऊन आलेल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा नेऊन सोडत आहे. या मजुरांच्या बाबत शासनाच्या कोणत्याच सूचना नसल्यामुळे आम्हाला काही करता येत नसल्याने नाइलाज आहे.' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com