
पुणे - कोट्यवधींचा खर्च करूनही शहरातील डुकरांची समस्या सुटत नसल्याने महापालिका प्रशासनाने आता त्यांचे सीमोल्लंघन करण्याचा निर्णय घेतला आहे. मोकाट डुकरे पकडण्यासाठी कर्नाटकातील ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. हा ठेकेदार पकडलेली डुकरे तिकडे घेऊन जाणार असून, त्यासाठी त्याने पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे.
डुकरांचा उपद्रव रोखण्यासाठी त्यांना राज्याच्या सीमेपलीकडे धाडण्याची भन्नाट योजना महापालिकेने अमलात आणली आहे. डुकरे पकडण्याचा खर्च फुगताना मोकाट डुकरांचा सुळसुळाट मात्र कायम आहे. मोठ्या तक्रारी उपनगरांमधील रहिवाशांनी महापालिकेकडे नोंदविल्या आहेत.
शहरात प्रामुख्याने उपनगरांत डुकरे वाढल्याने त्यांना ताब्यात घेण्यासाठी महापालिकेने ठेकेदाराची नेमणूक केली आहे. मात्र स्थानिक ठेकेदाराच्या कामाचा परिणाम होत नसल्याने हे काम कर्नाटकातील ठेकेदाराकडे दिले आहे. तेव्हा प्रत्येक डुकराचा भावही वाढविला. परिणामी, डुकरांची समस्या सुटण्यास मदत होईल, अशी आशा होती. प्रत्यक्षात परिस्थिती नेमकी उलट असल्याचे चित्र रहिवाशांच्या तक्रारींच्या आकड्यांवरून दिसून येत आहे. हडपसरमधील डुकरे पकडून ती महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात सोडण्याचा इशारा नगरसेवक नाना भानगिरे यांनी दिला. त्यानंतर सर्वसाधारण सभेत डुकरांवरील कारवाईबाबत प्रश्नांची सरबत्ती केली. तेव्हा आरोग्य खात्याने यावर खुलासा केला आहे.
शहरातल्या काही गल्लीबोळात मोकाट फिरणारी डुकरे हाती लागतायेत न लागतायेत, पण त्यांना पकडण्याचा भाव मात्र तिपटीने वाढला. डुकरे पकडण्यासाठी आठ महिन्यांत सव्वादोन कोटी रुपये खर्च झाला आहे. हा आकडा दीड वर्षापूर्वी ७५ लाखांत होता. दुसरी बाब म्हणजे, या डुकरांना आता पोलिस संरक्षणही देण्याचा विचार महापालिका करीत आहे. पण किती डुकरे पकडली जात आहेत? याबाबत महापालिकेकडे आकडेवारी उपलबध नाही.
डुकरांवर झालेला खर्च
२ कोटी १३ लाख - एप्रिल ते नोव्हेंबर २०१९
९४० रुपये (प्रत्येकी) डुक्कर पकडण्याचा दर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.