

पुणे, ता. २८ ः ‘‘प्रा. यास्मिन शेख या मराठी भाषेच्या जागरुक संरक्षक होत्या. त्यांची भाषाशास्त्र, व्याकरण, शुद्धलेखन संरक्षणाची भूमिका, नव्या काळात त्याच जबाबदारीने, आधुनिक तंत्रज्ञानाच्या पाठबळाने स्वीकारणे, हीच खरी आदरांजली ठरेल. ‘एआय’ प्रभावित पिढीसाठी ती प्रेरणा ठरेल,’’ असे मत महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे संचालक डॉ. विवेक सावंत यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
ज्येष्ठ भाषा आणि व्याकरणतज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आयोजित सभेत ते बोलत होते. याप्रसंगी ‘मसाप’च्या विश्वस्त डॉ. माधवी वैद्य, अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, प्रा. शेख यांच्या कन्या प्रा. रूमा बावीकर, डॉ. शमा भागवत, नात जुई आदी उपस्थित होते.
डॉ. वैद्य म्हणाल्या, ‘‘प्रा. शेख यांनी मराठीवर श्रीमंत प्रेम केले. मराठीचा शब्दसंभार आस्थेने सांभाळणाऱ्या त्या भाषायोगिनी होत्या,’’
‘‘आलेल्या प्रत्येक पत्राला स्वहस्ताक्षरात उत्तरे देणे, हे आईला कर्तव्य वाटत असे. अतिशय समाधानी वृत्तीने ती जगली,’’ असे रूमा बावीकर यांनी सांगितले. ‘‘स्वतःच्या दुःखाचे कुठलेच भांडवल न करता आयुष्यभर मराठी भाषेवर, मातृभाषेवर प्रेम करा, एवढा संदेश देणाऱ्या प्रा. शेख या मातृरूपात भेटल्या, हे सुदैव आहे,’’ अशा शब्दांत ‘अंतर्नाद’चे संपादक भानू काळे यांनी भावना व्यक्त केल्या.
मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमसुद्दीन तांबोळी, माजी आयकर आयुक्त संग्राम गायकवाड, लेखक दिलीप फलटणकर, डॉ. उज्ज्वला गोखले, डॉ. सागर देशपांडे, के. जी. पठाण, नागेश अंकुश यांनीही भावना व्यक्त केल्या. वर्षा काळे यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.