...मग काय इंदापुरातील शेतकऱ्यावर झाला पैशांचा पाऊस

डॉ. संदेश शहा
Wednesday, 7 October 2020

इंदापूर तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी दिपक आबासाहेब गुरगुडे यांची भगवा जातीचे डाळिंब बांगलादेशला रवाना झाली. या फळपिकातून त्यांना खर्च वजा जाऊन हातात ४७ लाख रुपयांचा नफा मिळाला आहे.

इंदापूर : इंदापूर तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी दिपक आबासाहेब गुरगुडे यांची भगवा जातीचे डाळिंब बांगलादेशला रवाना झाली. या फळपिकातून त्यांना खर्च वजा जाऊन हातात ४७ लाख रुपयांचा नफा मिळाला आहे. एकीकडे कोरोना महामारीचे संकट तर दुसरीकडे अतिवृष्टी झाली असताना देखील त्यांच्या डाळिंबाने चांगला दर मिळवून नफा मिळवला आहे. एकप्रकारे या नफ्यातून त्यांच्यावर पैशांचा पाऊस झाला आहे.

 बार, हॉटेलचालकांनो, आता नियम मोडू नका नाहीतर... 

दरम्यान दिपकचे आई-वडील हे शेतकरी असून, त्यांनी मुलास साहेब बनविण्यासाठी एमए बीपीएडपर्यंत शिकवले. मात्र दिपक याने नोकरीची अपेक्षा न ठेवता काळ्या आईची सेवा करण्याचे ठरविले. त्यांच्या साडेसहा एकर क्षेत्रापैकी त्याने साडेचार एकर क्षेत्रावर ९ बाय १४ फूट अंतरावर १८०० डाळिंबाची रोपे लावली. विशेष म्हणजे त्यांचे हे तिसरे पीक असून ६५ टन डाळिंब झाले. पैकी ४६ टन ए वन मालास १०१ रुपये प्रति किलो दर मिळून ती परदेशी रवाना झाली. बी ग्रेडच्या १० टन डाळिंबास ५० रुपये प्रति किलो तर सी ग्रेडच्या ९ टन डाळिंबास ३५ रुपये दर स्थानिक बाजार पेठेत मिळून त्यांना ५२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सेंद्रिय व रासायनिक खतांचा एकात्मिक वापर , जीवामृत, शेण व सरकी पेंड स्लरी, रोग कीड नियंत्रणासाठी अमावस्यावेळी केलेली फवारणी, प्रकाश सापळ्यांचा योग्य वापर, शेतात राबणाऱ्या संपूर्ण कुटुंबामुळे कामगार खर्चात झालेली बचत, स्थानिक व मोठ्या बाजारपेठेचा तुलनात्मक केलेला अभ्यास, बहार व्यवस्थापन, पीक, पाणी व खत नियोजन यामुळे डाळिंब पिकातून फायदा झाल्याचा दिपक यांचा अनुभव आहे.

उर्वरित क्षेत्रात पट्टा पध्दतीने ऊस, आंबा, वैरणीची पिके तसेच आंब्यात त्यांनी खरबूजाचे आंतर पीक घेऊन दुहेरी उत्पनाचा प्रयोग केला आहे. त्यांचा गाय, म्हैस व वासरे असे २५ जनावरांचा मुक्त गोठा असून, मुरघास व मिल्किंग मशिनचा ते वापर करतात. त्यांचे प्रतिदिन १८० ते १९० लिटर दुध उत्पादन होत असून प्रतिमहिना सुमारे १ लाख ४० हजार रुपयांची उलाढाल आहे. खर्च वजा जाता त्यांना ४० ते ५० हजार रुपये नफा होतो.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कर्नाला येथे शास्त्रोक्त दूध निर्मिती, कोईमतूर येथे ऊस पैदास केंद्रात घेतलेले प्रशिक्षण तसेच पंतप्रधान कौशल्य व उद्योजकता विकास योजने अंतर्गत इंदापूर व बाभूळगाव येथील प्रशिक्षणाचा या यशस्वी वाटचालीत सिंहाचा वाटा असल्याचे त्यांचे मत आहे. तालुका कृषि अधिकारी आबासाहेब रूपनवर, नाना साळुंखे, ओंकार काळे, हनुमंत बोडके तसेच संजय लोणकर यांनी या पिकासाठी तांत्रिक मदत केल्याचे त्यांनी सांगितले.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: profit of 47 lakh to farmers from pomegranate crop