esakal | राज्यात नव्या पाच कारागृहांचा प्रस्ताव; शिकागोच्या धर्तीवर होणार बांधणी
sakal

बोलून बातमी शोधा

Yerawada Jail

राज्यात नव्या पाच कारागृहांचा प्रस्ताव; शिकागोच्या धर्तीवर होणार बांधणी

sakal_logo
By
पांडुरंग सरोदे : सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी ठेवल्यानं आणखी कारागृहांची गरज भासत आहे. ही गरज लक्षात घेऊन कारागृह विभागाकडून पाच ठिकाणी नवीन कारागृह बांधण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. मुंबई, पुणे, हिंगोली, पालघर व गोंदिया या शहरात होणारी ही कारागृहे मियामी आणि शिकागो येथील कारागृहांच्या धर्तीवर 'मल्टी स्टोअर' पध्दतीने बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी मुंबईतील कारागृहास शासनाने तत्त्वत: मान्यताही दिली आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक (कारागृह) सुनील रामनंद यांनी मंगळवारी दिली. (Proposal for five new prisons in the state Chicago style construction aau85)

हेही वाचा: जगभरात तिसऱ्या लाटेची चिन्हं दिसू लागलीत; केंद्राचा भारतीयांना इशारा

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील कारागृहात केलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी रामानंद यांनी माहिती दिली. रामानंद म्हणाले, "राज्यात 45 ठिकाणी 60 कारागृह आहेत. यामध्ये क्षमतेच्या 154 टक्के कैदी आहेत. कारागृहांत 24 हजार कैद्यांची क्षमता असताना 37 हजार कैदी ठेवले आहेत. कोरोनाच्या कालावधीत 13 हजार 115 कैद्यांना तातडीच्या व अंतरिम जामिनावर सोडण्यात आले होते. यामुळे कैद्यांची संख्या 24 हजारावर आली होती. हीच संख्या आता पुन्हा 31 हजार इतकी आली आहे. मुंबईच्या आर्थर रोड कार्यालयाची क्षमता 800 आहे, तिथे 1600 कैदी आहेत. मुंबईला सध्या तातडीने नव्या कारागृहाची आवश्‍यकता आहे. प्रशासनाला चेंबुरच्या महिला व बालकल्याण विभागाची जागा मिळाली आहे. तेथे कच्चा कैद्यांसाठी 'मल्टी स्टोअर' कारागृह बांधण्यात येणार आहे. तेथे पाच हजार कैदी ठेवण्याची क्षमता असेल. तर पुण्यातील येरवडा कारागृह अडीच हजार कैदी आहेत. त्या परिसरात आणखी एका कारागृहाचा प्रस्ताव सरकारला पाठवण्यात आला आहे.''

५६ कैद्यांनी नाकारला पॅरोल

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 13 हजार 115 कैदी पॅरोल आणि जामीनावर सोडले आहेत. तर राज्यातील विविध कारागृहातील कच्च्या पक्‍क्‍या अशा 3 हजार 338 कैद्यांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. तर 1 हजार 21 कैद्यांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. तर 56 कैद्यांनी पॅरोल जामीन नाकारला.

कारागृहात रेस्तराँच्या धर्तीवर खाद्यपदार्थ

राज्यांतील कारागृहात आता रेस्तराँच्या धर्तीवर खाद्यपदार्थांची रेलचेल असणार आहे. हे खाद्यपदार्थ बंद्यांना कॅण्टीनमधून खरेदी करता येणार आहेत. आता 'रेडी टु इट' मासे, चिकन, मिठाई, सोनपापडी, ड्रायफ्रुट, कचोरी, समोसा, पनीर, विविध प्रकारचे ज्यूस, अंडा करी, मिनरल वॉटर, फळे, शुध्द तूप मिळणार आहे.

कारागृहातील ४ हजार कैद्यांना कोरोनाची लागण

राज्यातील कारागृहातील ४ हजार ६० कैद्यांना कोरोना झाला. त्यातील ३ हजार ९३३ जण कोरोनातून बरे झाले. तर सध्या ११४ जण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला. कारागृहातील ९१८ कर्मचारी कोरोनाबाधित झाले, त्यापैकी ८५९ जण कर्मचारी व अधिकारी बरे झाले. ५० जण सध्या उपचार घेत असून आत्तापर्यंत ९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.

loading image