लवकरच वीजग्राहकांना आनंदाची बातमी मिळण्याची शक्‍यता वाचा सविस्तर...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जुलै 2020

लॉकडाउनच्या काळात महावितरणकडून वीजमीटरचे रीडिंग घेणे बंद ठेवण्यात आले होते.त्यामुळे या कालावधीतील वीजबिले सरासरी वीजवापर गृहीत धरून महावितरणकडून ग्राहकांना पाठविण्यात आली होती

पुणे -  शंभर युनिटपर्यंत वीजबिल माफ, तर पाचशे युनिटपर्यंतच्या ग्राहकांना 25, 50 आणि 75 टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडून तयार करण्यात आला आहे. लवकरच तो मंत्रिमंडळाच्या बैठकीपुढे मांडण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी आमदारांना दिली. त्यामुळे लवकरच वीजग्राहकांनाही आनंदाची बातमी मिळण्याची शक्‍यता आहे. 

पुणे शहर व जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेण्यासाठी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात आले होते. बैठकीनंतर आमदारांनी पवार यांनी भेट घेऊन, वाढीव वीजबिलासह शहर व जिल्ह्यातील विविध प्रश्‍न मांडले. शंभर युनिटपर्यंत वीजबिल माफ करण्याबरोबरच त्यापुढील युनिटसाठी सवलत देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत तो मांडण्यात येणार आहे. त्यामुळे वाढीव वीजबिलावरून नागरिकांच्या ज्या तक्रारी आहेत. त्या संपुष्टात येतील, असे पवार यांनी सांगितले. 

1 ऑगस्ट पासून बदलणार 10 नियम, तुम्हाला बसू शकतो आर्थिक फटका​

लॉकडाउनच्या काळात महावितरणकडून वीज मीटरचे रीडिंग घेणे बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे या कालावधीतील वीजबिले सरासरी वीजवापर गृहीत धरून महावितरणकडून ग्राहकांना पाठविण्यात आली होती. त्यामध्ये अनेक त्रुटी असल्याने ग्राहकांना वाढीव रकमेची बिले असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून करण्यात आल्या. त्याचबरोबरच विरोधी पक्षानेदेखील यावरून राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. मध्यंतरी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीदेखील शंभर युनिटपर्यंत वीजबिल माफ करण्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही राज्य सरकारकडून झाली नव्हती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(Edited by : Kalyan Bhalerao)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Proposal for waiver of electricity bill up to one hundred units