उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये वेश्‍याव्यवसाय

पांडुरंग सरोदे
सोमवार, 17 जून 2019

पोलिसांसमोर परदेशी तरुणींची डोकेदुखी
सोसायट्यांमधील सदनिकांमध्ये वेगवेगळ्या नावांखाली सुरू असलेल्या वेश्‍याव्यवसायासाठी पश्‍चिम बंगाल, मणिपूर, नागालॅंड या राज्यांसह वेगवेगळ्या देशांमधील तरुणींचा वापर होत आहे. विशेषतः संबंधित तरुणी, महिलांना राहण्यासाठी त्याच सोसायट्यांमध्ये भाडेतत्त्वावर सदनिका घेऊन दिल्या जात आहेत. दलाल अन्य शहरांमध्ये बसून इंटरनेटद्वारे ग्राहकांचा शोध घेतात, ग्राहकापासून धोका नसल्याची खात्री पटल्यानंतर त्यास जाळ्यात ओढले जाते. इंटरनेटमुळे दलालाचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करणे पोलिसांना जिकिरीचे बनत आहे.

उपनगरांमध्ये स्पा, मसाज पार्लरच्या नावाखाली प्रकार सुरू
पुणे - वारजे येथील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये भाडेतत्त्वावर सदनिका घेऊन मसाज पार्लर, स्पा अशा गोंडस नावाखाली सध्या राजरोसपणे वेश्‍याव्यवसाय सुरू आहे. रहिवाशांकडून वारंवार होणाऱ्या तक्रारींकडे सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे. उपनगरांमध्ये व्यावसायिक संकुलांमध्ये मसाज पार्लर, स्पाच्या नावाखाली वेश्‍याव्यवसाय सुरू झाल्यानंतर आता तो निवासी क्षेत्रातही शिरकाव करू लागला आहे. स्थानिक पोलिसांसोबत सामाजिक सुरक्षा विभागाकडूनही कारवाई होत नसल्याने वेश्‍याव्यवसाय फोफावत असल्याचे चित्र आहे. 

शहराचे विस्तारीकरण होऊ लागल्याने उपनगरांमध्ये मोठमोठे गृहप्रकल्प, बड्या कंपन्या, शैक्षणिक संकुले, विद्यापीठे, बाजारपेठा, मॉल्स, चित्रपटगृहे वाढू लागली आहेत. त्याच पद्धतीने कामगार, विद्यार्थी व नोकरदार यांना आकर्षित करण्यासाठी उपनगरांमध्ये वेश्‍याव्यवसाय वाढू लागला आहे. गेल्या काही वर्षांपासून मोठमोठ्या व्यावसायिक संकुलांमध्ये मसाज पार्लर, स्पा अशा नावाखाली तरुणींकडून वेश्‍याव्यवसाय करून घेतला जात आहे. पोलिसांच्या कारवाईचा ससेमिरा टाळण्यासाठी काहींनी तर आपले बस्तान सोसायट्यांमधील सदनिकांमध्ये हलविले आहे. मात्र, याच त्रास रहिवाशांना विशेषतः महिलांना सर्वाधिक होतो. 

हे व्यवसाय करणाऱ्यांचे संबंध वरपर्यंत असल्याने नागरिक त्यांच्याविरुद्ध आवाज उठवण्याचे धाडस करीत नाहीत. 

या ठिकाणी सुरू आहे प्रकार 
नऱ्हे, आंबेगाव, मांजरी, हडपसर, चंदननगर, विश्रांतवाडी, वारजे, कोंढवा, मुंढवा येथे मोठ्या प्रमाणात नवीन गृहप्रकल्प उभे राहात आहेत. अशा प्रकल्पांमध्ये गुंतवणुकीसाठी सदनिका खरेदी करणारे मालक एजंटांमार्फत ती भाडेतत्त्वाने देतात. त्यामुळे संबंधित भाडेकरू कोण आहे, तो काय काम करतो याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती नसते. त्यामुळे अशा प्रकारच्या व्यवसायांना बळ मिळते.

सोसायट्यांतील सदनिकांमधील वेश्‍याव्यवसाय करणाऱ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये (मोका) कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे प्रमाण कमी आहे. व्यावसायिक संकुलांमध्ये मसाज पार्लर, स्पाच्या नावाखाली सुरू असणाऱ्या अवैध प्रकारांवरही पोलिसांनी नियंत्रण मिळविले आहे. सध्या इंटरनेटद्वारे ग्राहक शोधले जात आहेत. त्यावरही नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- भानुप्रताप बर्गे, सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prostitution in HIgh Class Society