

दुसऱ्या दिवशी
आंदोलनाची धडक
ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्यासाठी ‘इंडिया’चे खासदार रस्त्यावर
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. ७ : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या खासदारांनी बुधवारी लागोपाठ दुसऱ्या दिवशी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. ‘ज्ञानेशकुमार यांनी राजीनामा देईपर्यंत आम्ही थांबणार नाही. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा आम्हाला कुठल्याही प्रकारे थांबवू शकणार नाही,’ असा इशारा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिला.
मतदारयाद्यांच्या शुद्धिकरणाच्या नावाखाली मनमानीपणे ‘एसआयआर’ केल्याचा आरोप इंडिया आघाडीकडून करण्यात आला आहे. ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मंगळवारी इंडिया आघाडीच्या खासदारांनी निवडणूक आयोगावर मोर्चा काढला होता. त्यानंतर बुधवारी पुन्हा आयोगावर धडकण्याचा प्रयत्न केला. मात्र, जंतरमंतरवर पोहोचण्यापूर्वीच दिल्ली पोलिस आणि हजारो सुरक्षा दलांच्या कर्मचाऱ्यांनी राहुल गांधी आणि खासदार प्रियांका गांधी वद्रा यांच्यासह काँग्रेस, तसेच इंडिया आघाडीच्या खासदारांना जनपथावरच ताब्यात घेतले. जंतरमंतरवर शनिवारपासून कॉक्रोच जनता पक्षाचे आंदोलन सुरू होणार असून, त्यावरून जंतरमंतरवर आंदोलन करण्याचा इंडिया आघाडीचा इरादा होता. मात्र, दिल्ली पोलिस आणि सुरक्षा दलांपुढे त्यांचा हा प्रयत्न निष्फळ ठरला.
इंडिया आघाडीच्या मंगळवारच्या मोर्चाचे नाट्य रात्री साडेदहा वाजेपर्यंत चालले. आकाशवाणी भवनात साडेसात सात ठिय्या मांडून राहुल गांधींनी सुरक्षा यंत्रणेला जेरीला आणले होते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज जनपथावरील ‘सागररत्न’ हॉटेलात इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांना दुपारच्या भोजनासाठी निमंत्रित केले. भोजन झाल्यानंतर सर्व खासदार जंतरमंतरवर आंदोलन करण्यासाठी निघत असल्याची घोषणा राहुल गांधी यांनी केली. त्यानुसार तीन बसमध्ये खासदार निघाले असताना पोलिसांनी साडेचार वाजता त्यांना जंतरमंतर-अशोक रोडवरील चौकात रोखले. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी आजही रस्त्यावर बसून धरणे दिले. काँग्रेसचे अनेक नेते व खासदार बसेसवर उभे राहून निषेध नोंदवित होते. हे नाट्य दीड तास चालले. इंडिया आघाडीतील खासदारांच्या साथीला युवक काँग्रेस आणि एनएसयूआयचे कार्यकर्तेही पोहोचले होते. त्यामुळे जनपथ, अशोक रोड, कॅनॉट प्लेस आणि इंडिया गेटकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली होती. राहुल आणि प्रियांका यांना पोलिसांनी बळजबरीने उठवून बसमध्ये बसवून नेले, त्याचवेळी प्रियांका यांनी रस्त्यावर झोपून सुरक्षा कर्मचाऱ्यांचा विरोध केला. शेवटी राहुल गांधी, प्रियांका गांधी वद्रासह सर्व खासदारांना बसमध्ये घालून आंदोलन स्थळापासून हटविण्यात आले. पण राहुल गांधी यांना नेणारी बस काँग्रेस कार्यकर्त्यांनी पंक्चर केली. अखेर साडेसात वाजता बाराखंबा पोलिस ठाण्यातून राहुल गांधी यांची सुटका करण्यात आली, पण अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यातच होते.
प्रियांका, महुआंचा आरोप
आजच्या आंदोलनात केरळचे मुख्यमंत्री सतीशन , तसेच तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डीही सामील झाले होते. दिल्ली पोलिस खासदारांना मारहाण करीत असल्याचा आरोप प्रियांका गांधी वद्रा यांनी केला. महिला पोलिसांनी आपल्या अंगावर अनेक ठिकाणी ओरखडे काढले आणि जमिनीवर आदळले, असाही आरोप त्यांनी केला. महुआ मोईत्रा यांनीही पोलिस लाठीमार करीत असल्याचा आरोप केला.
‘राहुल गांधी, अखिलेश अहंकारात बुडालेले’
राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव हे अहंकारात बुडालेले नेते असल्याची टीका भाजपचे प्रवक्ते राकेश त्रिपाठी यांनी केली आहे. निवडणूक आयोगावरील मोर्चावेळी दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी दिसून आले. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत त्यांच्या आघाडीचा कितपत टिकाव लागणार, याबद्दल साशंकता आहे. अखिलेश यादव हे वेगळा सूर आळवत असून राहुल गांधी श्रेय लाटण्याच्या प्रयत्नात असल्याचे त्रिपाठी यांनी म्हटले आहे.
....
इंडिया आघाडीमध्ये नाराजीनाट्य
निवडणूक आयोगावर मंगळवारी काढलेल्या मोर्चाचे श्रेय काँग्रेसनेच श्रेय घेतल्याबद्दल इंडिया आघाडीच्या खासदारांनी रोष व्यक्त केला होता. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दुपारच्या भोजनाचे आयोजन केले होते. त्यामध्ये समाजवादी पक्षासह काही पक्षांचे खासदार सहभागी झाले नव्हते. या भोजनाचा निर्णय रात्री उशिरा घेतल्यामुळे काही खासदार त्यात सहभागी होऊ शकले नाही, असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटले आहे. माध्यमांमध्ये त्यावरून सुरू असलेल्या उलटसुलट चर्चेचे त्यांनी खंडन केले.
राहुल यांच्याविरुद्ध गुन्हा
निवडणूक आयोगावरील मोर्चादरम्यान, आकाशवाणी भवनामध्ये शिरकाव करत ठिय्या मांडल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह काही खासदार आणि कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांना पदावरून हटविण्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडीच्या खासदारांनी मंगळवारी निवडणूक आयोगावर मोर्चा काढला होता. पोलिसांनी हा मोर्चा अडवल्यानंतर राहुल-प्रियांका गांधी यांनी आपल्या समर्थकांनी आकाशवाणी भवनमध्ये शिरकाव केला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.