‘मृत्युंजय' च्या तब्बल ३० व्या आवृत्तीचे पुण्यात प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘मृत्युंजय' च्या तब्बल ३० व्या आवृत्तीचे पुण्यात प्रकाशन

‘मृत्युंजय' च्या तब्बल ३० व्या आवृत्तीचे पुण्यात प्रकाशन

पुणे : महाभारतातील कर्णाची भूमिका आणि त्याचा जीवनपट उलगडून दाखविणाऱ्या ‘मृत्युंजय’ या मराठी भाषेतील कादंबरीच्या तब्बल तिसाव्या आवृत्तीचे प्रकाशन पुण्यात मंगळवारी झाले. गेल्या ५४ वर्षांत मराठी मनांवर भुरळ घातलेल्या या कादंबरीची मोहिनी अजूनही वाचकांवर कायम आहे. मराठी भाषेतील या कादंबरीच्या तब्बल तीस आवृत्त्या आणि लाखांहून अधिक प्रती प्रकाशित होण्याचा दुर्मिळ योग यानिमित्ताने साधला गेला.

हेही वाचा: ठाण्यातील घटनेवरून बारामतीत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

शिवाजी सावंतांनी वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी ही कादंबरी लिहीली. ती प्रकाशित झाली तेव्हा ते २७ वर्षांचे होते. प्रभावी मांडणीमुळे आणि अजरामर साहित्य मूल्यांमुळे या कादंबरीला अफाट लोकप्रियता तर लाभलीच. त्याशिवाय अनेकविध पुरस्कारांची मोहरही त्यावर उठली. ‘मृत्युंजय’ या कादंबरीला अनेक मानाच्या पुरस्कारांसह भारतीय ज्ञानपीठाचा मूर्तीदेवी पुरस्कार देखील मिळाला.

नोबेल पुरस्कारासाठी कलकत्त्याहून १९९० साली मराठीतील पहिले नामांकन ‘मृत्युंजय’ला मिळाले. हिंदी, इंग्लिश, कन्नड, गुजराती, उडिया, मल्याळम्, बंगाली, तेलगु, राजस्थानी इ. दहा भाषांत ‘मृत्युंजय’ अनुवादित झाली आहे. आजही ही कादंबरी खपाचे नवनवे विक्रम करीत आहे.

हेही वाचा: विधानसभेची जागा काँग्रेस स्वबळावर लढवणार : विजय वट्टेडीवार

अशी आहे कादंबरीची जन्मकथा

या कादंबरीची जन्मकथा सांगताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, “कुरुक्षेत्रावरून आवश्यक संदर्भ गोळा करून परत आल्यानंतर सावंतांनी तीन महिन्यात पंधराशे पानांचे हस्तलिखित लिहून पूर्ण केले. अनेक प्रकाशकांच्या भेटी घेतल्या. या नवोदित लेखकाची ‘मृत्युंजय’ ही पहिली महाकादंबरी प्रकाशित करण्यासाठी तेव्हा महाराष्ट्रातील एकही प्रकाशक तयार नव्हता. मग सावंत पुण्यात येऊन ग. दि. माडगूळकरांना भेटले.

त्यांनी ती कादंबरी वाचून कॉन्टिनेन्टल प्रकाशनाचे अनंतराव कुलकर्णी यांना या कादंबरीच्या प्रकाशनासंदर्भात फोनवरून सांगितले. अनंतरावांनी गदिमांच्या सांगण्यानुसार कादंबरी वाचली आणि प्रकाशित करण्याचे ठरविले. गदिमांच्या हस्ते घरगुती पूजनानंतर ‘मृत्युंजय’ ही कादंबरी प्रकाशित झाली. पुढे जगन्मान्यता, अफाट लोकप्रियता आणि खपाचे सर्व विक्रम या कादंबरीने मोडले.”

हेही वाचा: बलात्कारग्रस्तांचे होणार मानसिक संगोपन

प्रकाशकांनी नाकारली; वाचकांनी स्वीकारली

प्रारंभी प्रकाशकांनी नाकारलेली ही कादंबरी पुढे जाऊन इतकी अफाट लोकप्रिय ठरते, हा एक चमत्कारच म्हणावा लागेल. ‘मृत्युंजय’ कादंबरीने शिवाजी सावंतांना देखील मराठी साहित्यविश्वात ठोस ओळख मिळवून दिली. ज्याचा फायदा त्यांना त्यांच्या पुढील ‘युगंधर’, ‘छावा’ या कादंबऱ्यांना देखील झाला. मात्र सावंत यांचे साहित्यविश्वातील महत्व केवळ खपाच्या विक्रमांपुरते मर्यादित नाही.

ऐतिहासिक आणि पौराणिक पात्रांची मानवी मूल्यांच्या अनुषंगाने केलेली मांडणी, ही आजच्या लेखकांसाठीही मार्गदर्शक आहे. आणि पुढेही तशीच राहील, असेही त्यांनी सांगितले. रूढ महाभारताची कथा माहिती असली तरी, ‘मृत्युंजय’मधून कर्णाच्या व्यक्तिरेखेवर अधिक प्रकाश पडला. त्यामुळे वाचकांचे कुतूहल वाढत गेले. त्यातून या कांदबरीची लोकप्रियता उत्तरोत्तर वाढतच आहे, असे मतही प्रा. जोशी यांनी व्यक्त केले.

loading image
go to top