Puen News : तळेगाव ढमढेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Puen News : तळेगाव ढमढेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा

तळेगाव - तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदाब व खोकल्याच्या औषधांचा तुटवडा असल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. येथील आरोग्य केंद्रात अनेक दिवसांपासून ही दोन औषधे नसल्याने नागरिकांना खाजगी मेडिकलच्या दुकानातून महागडी औषधे घ्यावी लागत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना आर्थिक भुर्दंड पडत आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्वरित दोन औषधांचा आवश्यक पुरवठा करावा अशी मागणी संजय गांधी अनुदान योजनेचे माजी तालुकाध्यक्ष संदीपअण्णा ढमढेरे यांनी केली आहे.

यावेळी श्री ढमढेरे म्हणाले की, प्राथमिक आरोग्य केंद्रात केस पेपरसाठी रुग्णांकडून पाच रुपये

नाममात्र शुल्क घेतले जात होते, परंतु हे शुल्क शासनाने आता पूर्णपणे माफ केलेले आहे. असे असले तरी उपचारानंतर लागणाऱ्या रक्तदाब व खोकल्याची औषधे मात्र येथील आरोग्य केंद्रात अनेक दिवसांपासून उपलब्ध नसल्याने रुग्णांना आर्थिक भुर्दंड मोठ्या प्रमाणात सोसावा लागत आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने त्वरित औषधे उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी श्री ढमढेरे यांनी केली आहे.

दरम्यान, तळेगाव ढमढेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज व सर्व सुविधानियुक्त इमारत बांधलेली असून, तेथे गेले वर्षभरापासून नवीन इमारतीत कामकाजही सुरू झालेले आहे. येथील आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. संध्या कारंडे तसेच डॉ. वर्षा गायकवाड, डॉ.विनीत राठोड तसेच १५ आरोग्य कर्मचारी व आशा वर्कर कार्यरत आहेत. येथील आरोग्य केंद्रात आयुष्यमान भारत योजना अंतर्गत विविध प्रकारचे लाभ रुग्णांना मिळत असले तरी औषधांच्या तुटवड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

दरम्यान, येथील औषधांच्या तुटवडा विषयी तालुका वैद्यकीय अधिकारी दामोदर मोरे यांच्याशी संपर्क साधला असता, येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक औषधांचा त्वरित पुरवठा केला जाईल असे आश्वासन दिले.

दरम्यान, सध्या परिसरात वातावरणातील बदलामुळे अनेक साथीचे आजार नागरिकांना होत असून, विविध आजारांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक औषधांचा पुरवठा करावा अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.