
केंद्र आणि राज्य सरकारच्या ई- पॉलिसी धोरणानुसार इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य दिले जाणार आहे. बाणेरमधीले ई- डेपो जागतिक दर्जाचा उभारला आहे.
- अमोल अवचिते
पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते बाणेर येथील डेपोतील १४० ई-बसचे (E-Bus) लोकार्पण मोठ्या थाटात करण्यात आले. त्यानंतर या सर्व बस दिमाखात प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल होतील, अशी अपेक्षा प्रवाशांना होती. मात्र, १४० पैकी केवळ ३० बसच रस्त्यावर धावत असून अजूनही ११० ई-बस ‘पॉवर’ (Power) विना डेपोतच उभ्या असल्याचे समोर आले आहे.
केंद्र आणि राज्य सरकारच्या ई- पॉलिसी धोरणानुसार इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य दिले जाणार आहे. बाणेरमधीले ई- डेपो जागतिक दर्जाचा उभारला आहे. तसेच प्रतिदिन प्रति बस २०० किमीप्रमाणे बस संचलनाचे नियोजन आहे. या ३५० बससाठी बाणेर, वाघोली, मोशी, चऱ्होली व निगडी हे पाच डेपो विकसित केले जाणार आहेत. डेपोवर एकावेळी ३५ बस चार्जिंग करता येणार आहेत. त्यासाठी ३५ एसी/डीसी चार्जर बसविलेले आहेत. पूर्ण चार्जिंग होण्यासाठी चार ते साडेचार तास लागतात. परंतु महावितरणकडून पुरेशी वीज मिळाली नसल्याने ई-बस उभ्या आहेत. नव्याने दाखल होणाऱ्या ई-बसच्या चार्जिंगचे नियोजन कसे करणार?, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
१४० ई-बस - पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
३० ई-बस - पाच मार्गांवर सेवा सुरु
७० बस - १४ मार्गांवर सुरु करणार
अशा मिळणार ई-बस
३५० - पुणे व पिंपरी महापालिका
१५० - केंद्राची फेम-२ योजना
काय आहेत अडचणी?
पूर्ण चार्जिंगसाठी चार ते साडेचार तास लागतात
महावितरणकडून पुरेशी वीज मिळेना
विजेअभावी ई बसला चार्जिंग करण्यास अडथळा
बाणेर ई-डेपोला ४५०० किलो वॉट विजेची आवश्यकता आहे. सध्या १२०० किलोवॉट इतकाच वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे ई बसला चार्जिंग करण्यास अडथळा येत आहे. महावितरणकडून स्वतंत्र डीपी उभारला जाणार आहे. त्यांचा महापालिकेकडे पाठपुरावा सुरु आहे. त्यामुळे काही दिवसात पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा सुरळीत होईल. या ई-बस पीएमपीच्या ताफ्यात अतिरिक्त दाखल झाल्या आहेत. त्यामुळे डेपोत या बस उभ्या असल्याने पीएमपीच्या उत्पन्नावर कोणताही परिणाम होत नाही.
- डॉ. चेतना केरूरे, सहव्यवस्थापकीय संचालिका
कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून ई-बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. मात्र याचे गांभीर्य पीएमपीला नाही. सध्या कर्मचाऱ्यांची संख्याही कमी आहे. त्यामुळे पीएमपीचे नुकसान होत आहे. सेवा सुरळीत करण्यासाठी तत्काळ नवीन भरतीची गरज आहे.
- सुनील नलावडे, सरचिटणीस, पीएमपी राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन
तुम्हाला काय वाटते ?
कोट्यवधी रुपये खर्चून फक्त वीज पुरवठ्याअभावी ई-बस जाग्यावरच उभ्या आहेत. याबाबत आपल्या नावासह प्रतिक्रिया editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या क्रमांकावर पाठवावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.