
पुणे:मानव-पशू संघर्ष सुरूच; बाराच तासांत तिघांवर बिबट्याचा हल्ला
पुण्यातल्या दोन ठिकाणी झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये दोन महिलांसह तीन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. पुणे जिल्ह्यातल्या खेड आणि आंबेगाव तालुक्यात मंगळवारी रात्री आणि गुरुवारी सकाळी बिबट्याच्या हल्ल्यात या घटना घडल्या आहेत. यापैकी एका महिलेची प्रकृती गंभीर आहे.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विविध ठिकाणी झालेल्या या हल्ल्यानंतर वनविभागाच्या जवानांनी तात्काळ प्रतिसाद दिला असून आमचे गट हे परिस्थिती जाणून घेण्यासाठी घटनास्थळी पोहोचले आहे. या गावांच्या आजूबाजूला असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा: पुणे : बारामती वनपरिक्षेत्रात लवकरच सुरु होणार बिबट्या सफारी
पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर विभागातल्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातल्या रेतवाडी गावातल्या दोन महिलांवर बिबट्याने हल्ला केला. हे दोन्ही हल्ले साधारण दीड किलोमीटर अंतरावर झाले आहेत. रेतवाडीमधल्या या महिलांची नावे अरुणा भालेकर आणि रिझवाना अब्दुल पठाण अशी आहेत. भालेकर यांना या हल्ल्यात गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आंबेगाव तालुक्यातल्या थोरांडले गावातल्या एका १७ वर्षीय मुलावरही बिबट्याने हल्ला केला. पिकाला पाणी द्यायला गेला असताना त्याच्यावर हा हल्ला झाला असून यात त्याच्या चेहऱ्याला दुखापत झाली आहे. जुन्नर वनविभागाच्या हद्दीत गेल्या २० वर्षांपासून अनेकदा मानव-पशू संघर्षाच्या घटना घडलेल्या आहेत.
Web Title: Pune 3 Persons Injured In Leopard Attack On Several Locations
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..