पुणे : कोरोना रुग्णांसाठी ६७ रुग्णवाहिका; हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचं पालिकेचं आवाहन

ambulance
ambulance

पुणे शहरात कोरोना रुग्णांना वेळेवर उपचार सुरू व्हावेत, त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी महापालिकेने ६७ रुग्णवाहिका विनामूल्य उपलब्ध केल्या असून, यांपैकी ऑक्सिजनची सुविधा असलेल्या ५६ रुग्णवाहिका २४ तास नागरिकांच्या सेवेत असणार आहेत. गरजूंनी हेल्पलाइनवर संपर्क साधून रुग्णवाहिकांची मागणी करावी, असं आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आलं आहे.

शहरात दररोज हजारो कोरोना रुग्णांची भर पडत आहे. गंभीर रुग्णांची संख्या देखील वाढतच आहे. कोरोना रुग्णांची प्रकृती खालवल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध होणं गरजेचं आहे. सध्या रुग्णवाहिका वेळेत येत नसल्याने रुग्णांना रिक्षा किंवा इतर खासगी वाहनातून रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे. या बिकट परिस्थितीत  महापालिकेने रुग्णवाहिका व शववाहिका उपलब्ध केल्याने रुग्णांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

महापालिकेकडून आयसोलेशन, कोविड सेंटर व विविध रुग्णालये यांचेकडील कामकाजासाठी रुग्णवाहिका व मृतांसाठी शववाहिका पुरविण्यात येत आहेत. महापालिकेकडे केवळ ४६ रुग्णवाहिका असून, त्या अपुऱ्या पडत असल्याने ५५ खासगी रुग्णवाहिका अधिग्रहण केल्या आहेत. या १०१ रुग्णवाहिकांपैकी २३ शववाहिका तर ७८ वाहनं रुग्णवाहिका म्हणून वापरली जाणार आहेत. 

६७ रुग्णवाहिका कोरोना रुग्णांसाठी 

७८ रुग्णवाहिकांमध्ये ६७ रुग्णवाहिका या कोरोना रुग्णांसाठी वापरल्या जाणार आहेत, त्यातील ६३ रुग्णवाहिकांमध्ये ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध आहे. त्यांपैकी ५६ रुग्णवाहिका २४ तास कार्यरत असणार आहेत. तर उर्वरित ११ रुग्णवाहिका या कोरोना शिवाय अन्य रुग्णांसाठी वापरल्या जाणार आहेत.

हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचं आवाहन

शहरामधील आयसोलेशन, कोविड सेंटर किंवा विविध रुग्णालयांतील रुग्णांसाठी रुग्णवाहिका आवश्‍यक असल्यास त्यांनी महानगरपालिकेच्या कोविड-१९ नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक ९६८९९३९३८१ किंवा शासनाच्या १०८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आलं आहे. तसेच रुग्णवाहिकेपूर्वी रुग्णाला बेडची आवश्यकता असल्यास तो कुठे उपलब्ध आहे याची माहिती करून घेण्यासाठी बेड व्यवस्थापन कक्षाच्या ०२०-२५५०२११० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे त्यानंतरच रुग्णवाहिकेची मागणी नोंदवण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. तसेच कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीसाठी शववाहिका उपलब्ध करून दिली जाईल. त्यासाठी पीएमपीच्या नियंत्रण कक्षातील ९६८९९३९६२८, ९०११०३८१४८, ०२०-२४५०३२११, ०२०- २४५०३२१२८ या क्रमांकावर संपर्क साधावं, असं आवाहनही आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांनी केलं आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com