esakal | Pune : एका महिलेने वृद्ध महिलेस गुंगीचे औषध देत केला आठ लाखाचा ऐवज लंपास
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune : एका महिलेने वृद्ध महिलेस गुंगीचे औषध देत केला आठ लाखाचा ऐवज लंपास

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : उच्चभ्रु कुटुंबातील वृद्ध महिलेकडे घरकाम करण्याचा बहाणा करून, वृद्ध महिलेस पिण्याच्या पाण्यातुन गुंगीचे औषध देत एका महिलेने घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा तब्बल आठ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. हि घटना कल्याणीनगर येथे घडली.

याप्रकरणी 73 वर्षीय महिलेने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन अनोळखी महिलेविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक विशाल पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वृद्ध या कल्याणीनगर येथील इंद्रप्रस्थ सोसायटीमधील त्यांच्या सदनिकेमध्ये एकट्या राहतात. तर त्यांचे अन्य कुटुंबीय तेथेच खालच्या मजल्यावरील सदनिकेमध्ये राहतात.

फिर्यादीस रक्तदाब, मधुमेहाचा आजार असल्याने त्यांना घरातील कामे करण्यास अडचण येते. त्यामुळे त्यांच्याकडून घरकाम करणाऱ्या महिलेचा शोध सुरू होता. दरम्यान, एका ओळखीच्या व्यक्तीमार्फत घरमकाम करणाऱ्या महिलेची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार, 27 जुन 2021 पासून संबंधित महिला त्यांच्याकडे घरकाम करण्यास येऊ लागली.

दोन ते तीन दिवस महिला त्यांच्याकडे काम करीत होती. त्याचवेळी तिने घराची व्यवस्थित माहिती घेतली. त्यानंतर 29 जुनला महिलेने वृद्ध महिलेस पिण्यासाठी पाणी दिले. त्यामध्ये तिने गुंगीचे औषध मिसळल्याने वृद्ध महिला बेशुद्ध झाली. त्यानंतर तिने घरातील कपाटात ठेवलेली चार हजार रुपयांची रोकड व सोन्याचे दागिने असा आठ लाख 8 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. दुसऱ्या दिवशी हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर महिलेने पोलिसांकडे फिर्याद दिली.

अशी घ्या काळजी

  1. सेवा, शुश्रृषा करणाऱ्या व्यक्ती, घरकामगार ठेवताना चारित्र्य पडताळणी करून घ्या

  2. पोलिसांनी अधिकृत केलेल्या एजन्सीकडूनच कामगार घेण्यास प्राधान्य द्यावे

  3. संबंधीत घरकामगारांची वैयक्तीक माहिती, फोटो आपल्याजवळ ठेवावा

  4. -ज्येष्ठ नागरीक संघ, नजिकच्या पोलिस ठाण्यामध्ये याबाबत माहिती देऊन ठेवावी

loading image
go to top