Pune Accident : PMP बसची - दुचाकीला धडक ; दोन तरुणांचा जागीच मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident PMP bus-two-wheeler

Pune Accident : PMP बसची - दुचाकीला धडक ; दोन तरुणांचा जागीच मृत्यू

सिंहगड : पीएमपी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक हद्दीत ॲक्वेरिअस हॉटेल च्या समोर घडली आहे. आदित्य राजेंद्र देशमुख(वय 22, रा. तनीष सृष्टी, आळंदी देवाची) आणि निलेश मल्लेश मित्रे (वय 22, रा. ताडीवाला रोड, पुणे) अशी या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.

काल दि. 28 जानेवारी रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पीएमटी बस(एम एच 12 आर एन 9071) स्वारगेट वरुन खानापूरकडे जात होती तर तरुण दुचाकीवरून डोणजे बाजूकडून पुण्याच्या दिशेने येत होते.

गोऱ्हे बुद्रुक गावच्या हद्दीत खडकवासला धरणाला लागून असलेल्या ॲक्वेरिअस हॉटेल च्या समोर बस व दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दोन्ही तरुण अत्यवस्थ होऊन पडले होते. त्यांना तातडीने उपचारांसाठी खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते परंतु उपचारांपुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

अपघाताची माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. दोन्ही तरुणांचे मृतदेह खाजगी रुग्णालयातून उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार सतीश कदम याबाबत अधिक तपास करत आहेत.

वळण, अंधार आणि गतीरोधकांचा अभाव....... ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी रस्त्याला वळण असून पथदिवे नसल्याने रात्रीच्या वेळी काळोख असतो. रस्त्याचे काम झालेले असल्याने वाहने अत्यंत वेगाने ये-जा करतात. रस्त्यावर कोठेही गतीरोधक नसल्याने वेगावर नियंत्रण राहत नाही त्यामुळे यापूर्वीही या ठिकाणी अनेक अपघात झालेले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने अनेक वेळा अपघात झालेले असताना नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत.