Pune : टेम्पो व दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील माय लेकांसह तिघांचा जागीच मृत्यू Pune accident tempo and a two-wheeler Three died | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

accident

Pune : टेम्पो व दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील माय लेकांसह तिघांचा जागीच मृत्यू

पारगाव : खडकवाडी ता. आंबेगाव (जि. पुणे) येथील विद्यमान ग्रामपंचायत सदस्या विजया दिलीप डोके (वय ४५ वर्ष) व त्यांचा मुलगा संकेत दिलीप डोके (वय २० वर्ष) या माय लेकांसह संकेतचा जिवलग मित्र ओंकार चंद्रकांत सुक्रे (वय २० वर्ष) या तिघांचा धामारी (ता. शिरुर) गावाच्या हद्दीतून जाणाऱ्या बेल्हा जेजुरी महामार्गावर टेम्पोची दुचाकीला जोरात धडक बसून दुचाकीवरील तिघांचाही जागीच मृत्यू झाला आहे तर टेम्पो चालकहि जखमी झाला आहे हा अपघात काल शुक्रवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला.

आंबेगाव तसेच शिरूर तालुक्यातुन जाणाऱ्या बेल्हा जेजुरी महामार्गावर अपघातांचे प्रमाण वारंवार वाढत असताना काल शुक्रवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात माय लेकांसह एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. संकेत डोके हा आई विजया डोके हिला शिक्रापूर येथील नातेवाईकाच्या पुजेच्या कार्यक्रमाला सोडण्यासाठी एम. एच. १४ एच. आर. ७०७३ या दुचाकीहून चालला होता परत येताना सोबतीला म्हणून जिवलग मित्र ओंकार सुक्रे याला बरोबर घेतले.

धामारी येथील खंडोबा मंदिराच्या जवळली वळणावर शिक्रापूरच्या बाजूने आलेल्या एम. एच. १४ जि. यु. ६८८० या टेम्पोची डोके याच्या जोरदार धडक बसून भीषण अपघात झाल्याने दुचाकी वरील तिघांना गंभीर मार लागल्याने संकेत दिलीप डोके (वय २० वर्षे) विजया दिलीप डोके (वय ४५ वर्षे) या माय लेकांसह ओंकार चंद्रकांत सुक्रे (वय २० वर्षे) तिघे रा. खडकवाडी ता. आंबेगाव जि. पुणे या तिघांचा जागीच मृत्यू झाला,

घडलेल्या घटनेबाबत संपत चंदर डोके यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्याद वरून शिक्रापूर पोलिसांनी टेम्पो चालक अक्षय बबन साकोरे (रा. चांडोली राजगुरूनगर ता. खेड ) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेश माने व राकेश मळेकर हे करत आहे.

“ विजया डोके लवकरच होणार होत्या सरपंच “ .

विजया दिलीप डोके या खडकवाडी ग्रामपंचायतीच्या शिवसेनेच्या विद्यमान सदस्या आहेत येथील सरपंचपद महिलेसाठी राखीव असल्याने पक्षातील तिनही महिला सदस्यांना सरपंच पदाची संधी मिळावी म्हणुन पाच वर्षाच्या कार्यकालाची विभागणी करण्यात आली होती दोन सदस्यांना सरपंच पदाची संधी मिळाली होती आता विजया डोके यांचा नंबर असल्याने सहा महिन्यानंतर विजया डोके यांची सरपंचपदी निवड होणार होती परंतु नियतीच्या मनात वेगळेच होते सरपंच होण्याचे त्यांचे स्वप्न अपुरे राहिले.

“ जिवलग मित्रांच्या मृत्युने हळहळ ”

संकेत दिलीप डोके व ओंकार चंद्रकांत सुक्रे हे दोघे जिवलग मित्र ते नेहमी एकत्र असत या दोघांचाही अपघातात मृत्यु झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.