Pune : बायोमॅट्रीक हजेरीचे बंधन पण प्रशासनाची तयारीच नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Municipal Corporation

Pune : बायोमॅट्रीक हजेरीचे बंधन पण प्रशासनाची तयारीच नाही

पुणे : बायोमेट्रीक हजेरी लावा अन्यथा पगार काढू नका असे आदेश महापालिका प्रशासनाने दिले आहेत. पण बायोमेट्रीक मशिनला थम करताना अनेक वेळा प्रयत्न करूनही हजेरी न लागणे, इंटरनेट बंद पडणे अशा अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने कर्मचारी त्रस्त झाले आहेत. डोळे स्कॅन करण्याच्या मशिनही अद्याप महापालिकेत बसलेल्या नाहीत. त्यामुळे एकीकडे कारवाईचा बडगा उचललेला असताना दुसरीकडे प्रशासनाची पूर्ण तयारी नसल्याचेही समोर आले आहे.

कोरोनाच्या काळात संसर्गाचा धोका असल्याने प्रशासनाने कर्मचारी, अधिकाऱ्यांची बायोमेट्रीक हजेरी बंद केली. त्याऐवजी पारंपरिक पद्धतीने संबंधित विभागातील वहीमध्ये स्वाक्षरी करून उपस्थिती लावली जात होती. कोरोनाची साथ ओसरल्यानंतर अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी बायोमेट्रीक हजेरीचे आदेश काढले. पण बहुतांश कर्मचारी बायोमेट्रीक ऐवजी स्वाक्षरीलाच प्राधान्य देत असल्याचे निदर्शनास आले असल्याने आता बायोमेट्रीक हजेरी लावा अन्यथा १५ नोव्हेंबरपासूनचा पगार बंद करा असे आदेश बिनवडे यांनी काढले आहेत.

पुणे महापालिकेतील सेवकांसाठी प्रशासनाने बायोमेट्रीक हजेरी आधारशी जोडली आहे. कर्मचारी कामावर कधी आला, कधी गेला याची बरोबर माहिती मिळते. त्यामुळे लेट लतीफ कर्मचाऱ्यांना शिस्त लागणार आहे. हा आदेश काढल्यानंतर बायोमेट्रीक हजेरी लावणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पण या मशिन व्यवस्थित चालत नसल्याने सकाळी हजेरी उशिरा लागण्याचा धोका निर्माण झाला आहे.

सकाळी कार्यालयाची वेळ सुरू होताना व संध्याकाळी काम संपल्यानंतर हजेरी लावण्यासाठी गर्दी होते. त्यामुळे एका कर्मचाऱ्याची लगेच हजेरी लागत नाही. त्यामुळे वारंवार प्रयत्न करावे लागत आहेत. शिवाय इंटरनेट बंद असल्याचे दाखवले जाते. त्यामुळे इतर मशीनकडे धाव घेऊन हजेरी लावण्यासाठी गडबड करावी लागत आहे, तसेच डोळे स्कॅन करण्याची मशिन उपलब्ध नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

‘‘सर्व बायोमेट्रीक मशिन योग्य पद्धतीने चालत आहेत, पण काही अडचणी येत असल्यास त्या तपासल्या जातील. तसेच डोळ्याच्या स्कॅन करण्याच्या मशिन रिपेरिंगसाठी पाठविल्या आहेत. त्या उद्या बसविल्या जातील.’’

- श्रीनिवास कुंदूल, मुख्य अभियंता, विद्युत विभाग

३०० कर्मचाऱ्यांची नोंदणी

जे कर्मचारी बायोमेट्रीक हजेरी लावणार नाहीत त्यांचा पगार काढला जाणार नाही, असा इशारा दिला आहे. त्यामुळे त्यांनी आत्तापर्यंत बोटाचे ठसे, आधार कार्ड क्रमांक दिला नाही अशा कर्मचाऱ्यांनी विद्युत विभागात गर्दी केली होती. दिवसभरात सुमारे ३०० कर्मचाऱ्यांची माहिती भरण्यात आली आहे. यासाठी तीन संगणकावर आज सायंकाळनंतरही काम सुरू होते.