Pune Airport : पुण्याची २१ शहरांशी एअर कनेक्टिव्हिटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune airport

Pune Airport : पुण्याची २१ शहरांशी एअर कनेक्टिव्हिटी

पुणे : लोहगाव विमानतळ सुमारे पंधरा दिवसांच्या खंडानंतर पुन्हा एकदा प्रवाशांनी गजबजला. सात विमान कंपन्यांच्या माध्यमातून २१ शहरांशी पुण्यातून कनेक्टिव्हिटी शनिवारी प्रस्थापित झाली.

विमानतळावरील धावपट्टीच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाने १६ ते २९ ऑक्टोबरदरम्यान विमानतळ पूर्णतः बंद ठेवला होता. विमान वाहतूक शनिवारी सुरू झाली. दिल्लीवरून आलेले विमान शनिवारी (ता. ३०) आज सकाळी ८ वाजून ६ मिनिटांनी विमानतळावर उतरले. त्यात १०० प्रवासी होते. विमानतळ प्रशासनाने या प्रवाशांचे गुलाबाचे फूल देऊन त्यांचे स्वागत केले. विमानतळ बंद असताना प्रशासनाने मुख्य प्रवेशद्वारासमोरील रस्त्याचे रुंदीकरण केले. तसेच कॅब कंपन्या आणि रिक्षांसाठीच्या विभागातही देखभालीची कामे केली. दिपावलीमुळे प्रवाशांची संख्या जास्त होती. सुमारे ५६ विमानाच्या ११२ फेऱ्या पहिल्या दिवशी झाल्या.

दिल्ली, बंगळूर, हैदराबाद, नागपूर, लखनौ, भुवनेश्वर, चंडीगड, रायपूर, तिरुपती, अलाहाबाद, कोलकत्ता, इंदोर, रांची, जबलपूर, चेन्नई, कोची, पटणा, गोवा, अहमदाबाद, जयपूर, ओझर आदी शहरांशी पहिल्या दिवशी कनेक्टिव्हिटी झाली. एअर इंडिया, विस्तारा, स्पाईस जेट, गो फर्स्ट, इंडिगो, एअर एशिया, अलायन्स एअर या विमान कंपन्यांनी वाहतूक केली. दरम्यान, विमानतळावर सकाळी ८ ते रात्री ८ दरम्यान वाहतूक ३० नोव्हेंबरपर्यंत सुरू होणार असून त्यानंतर पुढील नियोजन जाहीर करण्यात येईल, असे विमानतळ प्रशासनाने जाहीर केले.

या पार्श्वभूमीवर हवाई वाहतूक विश्लेषक धैर्यशील वंडेकर म्हणाले, ‘‘विमानतळ खुला झाल्यावर प्रवाशांची गर्दी होणार, हे स्वाभाविक आहे. कारण दिवाळीमुळे वाहतूक वाढते. हे लक्षात घेऊन विमानतळ प्रशासनाने जादा मनुष्यबळ तैनात करण्याची आवश्यकता होती. तसेच प्रवाशाने विमानतळाच्या आवारात प्रवेश केल्यावर त्याची सिक्युरिटी एरिआ पार करेपर्यंतची फ्लोअर मॅनेजमेंट अचूक असायला हवे.’’ विमानतळ प्रशासनाला या बाबत आठ दिवसांपूर्वीच ई-मेलद्वारे कल्पना दिली होती, असेही त्यांनी सांगितले.

विमानतळावर गोंधळ

प्रवाशांची अचानक गर्दी झाल्यामुळे विमानतळावर सकाळी आणि सायंकाळी काही प्रमाणात गोंधळ झाला. मुख्य इमारतीच्या आवारात वाहतुकीची कोंडी झाली. तसेच चेक इन करण्यासाठीही रांगा होता. सिक्युरिटी तपासणीसाठीही मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना अर्धा ते एक तास थांबावे लागत होते. दिवाळीमुळे प्रवाशांनी विमानाच्या वेळेपूर्वी किमान ३ तास पोचावे, असे आवाहन विमानतळ संचालक संतोष ढोके यांनी केले आहे..

Web Title: Pune Airport Shut For Runway Repair Resumes Operations After 14 Days Connet 21 Cities

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :punepune airport
go to top