
पुणे : दुबईहून पुण्याला येणारे स्पाइसजेटचे (एसजी-५०) विमान प्रवाशांचे सामान न घेताच पुण्यात दाखल झाले. पुण्यात दाखल झाल्यावर प्रवासी बॅगेज बेल्टजवळ सामानाची वाट पाहत थांबले होते. बराच वेळेनंतरही सामान येत नसल्याने त्यांनी संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता, सामान दुसऱ्या विमानाने येणार असल्याचे सांगण्यात आले. विमानात इंधनाचा साठा वाढल्याने भार पेलण्याची विमानाची क्षमता संपली, त्यात पुन्हा सामानाचा भार नको म्हणून बॅगेज आणले नसल्याचे स्पाइसजेटने सांगितले. ही घटना गुरुवारी (ता. २६) सकाळी पुणे विमानतळावर घडली.