रेल्वे रोको : पुण्यातही दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या हाकेला प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 18 February 2021

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या हाकेला प्रतिसाद देण्यासाठी पुण्यातही रेल्वे रोको आंदोलन करण्यात येत आहे.  शिवजयंती पूर्वदिनी शेतकरी प्रश्नी रेल्वे रोको आंदोलन करुन करणार अभिवादन करणार आहेत.

पुणे : उद्योगपती अदानी-अंबानी तुपाशी-शेतकरी उपाशी, अन्यायकारक शेतकरी कायदे मागे घ्या, शेतकरी विरोधी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुर्दाबाद आदी घोषणा देत पुण्यातील शेतकरी बचाव संयुक्त कृती समिती आणि महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांनी गुरुवारी (ता. १८) पुणे स्टेशन येथे रेल रोको आंदोलन केले. आंदोलकांनी दुपारी एक वाजता मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस रोखली. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी तीन आंदोलकांना अटक केले. सायंकाळी या तिघांची जामिनावर सुटका करण्यात आली.

महाविकास आघाडीतर्फे आंदोलन; तिघांना अटक व सुटका
शेतकरी बचाव संयुक्त कृती समितीचे निमंत्रक नितीन पवार यांनी यावेळी सांगितले की, या आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आम आदमी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, जनता दल (धर्मनिरपेक्ष), राष्ट्र सेवा दल, अंगमेहनती कष्टकरी संघटना आदी पक्ष-व संघटनांचे नेते, कार्यकर्ते सहभागी झाले होते. समितीचे निमंत्रक नितीन पवार, शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष सागर आल्हाट व शिवप्रेमी समितीचे मुकुंद काकडे यांच्यावर रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करत, त्यांना अटक केले. त्यानंतर जामिनावर त्यांची सुटका झाली. यावेळी झालेल्या सभेत विविध वक्त्यांनी केंद्र सरकारच्या शेती कायदे, पेट्रोल-डिझेल दरवाढ, सरकारी कंपन्यांची विक्री व खासगीकरणाच्या धोरणाचे वाभाडे काढले.

कृषी कायदे रद्दसाठी पुण्यात रेल रोको
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या ८५ दिवसांपासून देशव्यापी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या हाकेला प्रतिसाद देण्यासाठी पुण्यातही शेतकरी बचाव समिती कार्यरत आहे. राष्ट्रीय आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या किसान संयुक्त मोर्चाने १८ फेब्रुवारी रोजी देशभर रेल्वे रोकोचे आवाहन केले होते.

या आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, पुणे पालिकेतील विरोधी पक्ष नेत्या दीपाली धुमाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदीप देशमुख, शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे, उपप्रमुख राजेंद्र शिंदे, आम आदमी पक्षाचे मुकुंद किर्दत, जनता दलाचे शहराध्यक्ष विठ्ठल सातव, माजी महापौर कमल व्यवहारे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अभय छाजेड, नगरसेवक अरविंद शिंदे आदींसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune also responds to the call of farmers Rail Roko agitation in Delhi