पुणे : शहरातील कुख्यात गुंड आंदेकर टोळीने मध्य प्रदेशातील उमरटी गावातून १५ पिस्तुलांची खरेदी केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्या पिस्तुलांचा विविध गंभीर गुन्ह्यात वापर करण्यात आला आहे. त्यामुळे आंदेकर टोळीविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. गेल्या काही वर्षात मध्यप्रदेशातील उमराटीतून एक हजार पिस्तुलांची विक्री महाराष्ट्रात झाल्याचे धागेदोरे पुणे पोलिसांच्या हाती लागले आहेत. येथील पिस्तूल कारखान्यांवर कारवाई केल्यानंतर पुणे पोलिसांनी पुण्यासह महाराष्ट्रात पिस्तुलांची विक्री करणारी साखळी शोधण्यास सुरुवात केली आहे.