esakal | पुणे: अंगणवाडीसेविका भरतीला चौथ्यांदा ब्रेक
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे: अंगणवाडीसेविका भरतीला चौथ्यांदा ब्रेक

पुणे: अंगणवाडीसेविका भरतीला चौथ्यांदा ब्रेक

sakal_logo
By
गजेंद्र बडे -सकाळ वृत्तसेवा

पुणे: अंगणवाडीसेविका आणि मदतनिसांच्या भरती प्रक्रियेला राज्य सरकारने चौथ्यांदा स्थगिती दिली आहे. या स्थगितीमुळे रिक्त असलेली पदे भरण्याबाबत पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे. मागील पाच वर्षांपासून राज्यातील सेविका आणि मदतनिसांची मिळून ६ हजार ३८४ जागा रिक्त आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील सुमारे अडीचशे जागांचा समावेश आहे.

हेही वाचा: पुणे : विहीर खोदताना सापडलेली दशभुज चिंतामणी मूर्ती

राज्यातील एकूण रिक्त जागांमध्ये अंगणवाडीसेविकांच्या ३ हजार ४३६, मिनी अंगणवाडीसेविकांच्या १ हजार ११७ आणि मदतनिसांच्या १ हजार ८३१ जागा आहेत. या सर्व जागा २०१६ पासून रिक्त असल्याचे राज्याच्या महिला व बालविकास विभागातून सांगण्यात आले.

या जागा भरण्यासाठी २०१७ मध्ये भरती प्रक्रिया सुरु करण्याचा आदेश राज्य सरकारने दिला होता. या आदेशानुसार ही भरती प्रक्रिया सुरु झाली होती. त्यानंतर ते मध्येच स्थगित केली होती. त्यानंतर दरवर्षी या भरतीला परवानगी देण्यात आली आणि प्रक्रिया सुरु होताच, ती स्थगित करण्यात आली. या स्थगितीसाठी कधी अर्थ विभागाने परवानगी नाकारल्याचे तर, कधी निधी नसल्याचे कारण दिले. मागील दोन वर्षांपासून कोरोना संसर्गाचे कारण देत या भरतीला स्थगिती दिली होती.

ही स्थगिती पुन्हा १ सप्टेंबर २०२१ ला उठवत, काही जिल्ह्यांचा अपवाद वगळता पुण्यासह अन्य जिल्ह्यांतील निम्मी रिक्त पदे भरण्यास राज्य सरकारने परवानगी दिली होती. तसा आदेश जिल्हा परिषदांना दिला होता. या आदेशानुसार जिल्हा परिषदांनी ही प्रक्रिया सुरु केली होती. परंतु या भरतीलाही आता सरकारने स्थगिती दिली आहे.

राज्यातील नंदूरबार, गडचिरोली, उस्मानाबाद, वाशीम, आणि गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, पालघर व अमरावती या जिल्ह्यांमधील काही तालुक्यांतील सर्व रिक्त पदे भरण्यास आणि या जिल्ह्यांव्यतिरिक्त अन्य सर्व जिल्ह्यांमधील ५० टक्के पदे भरण्याचा आदेश राज्य सरकारने दिला होता.

पुणे जिल्ह्यात सुमारे अडीचशे जागा रिक्त

पुणे जिल्ह्यात अंगणवाडी व मिनी अंगणवाडीसेविका आणि मदतनिसांच्या मिळून २३९ जागा रिक्त आहेत. यामध्ये १८९ अंगणवाडीसेविका आणि ५० मदतनिसांच्या जागांचा समावेश आहे. सरकारच्या भरती आदेशानुसार अंगणवाडीसेविकांच्या ९५ जागा आणि मदतनिसांच्या २५ जागा भरण्याचा मार्ग मोकळा झाला होता. जिल्ह्यात एकूण ४ हजार २४६ अंगणवाड्या आणि ४५२ मिनी अंगणवाड्या आहेत. या दोन्ही अंगणवाड्यांसाठी मिळून अंगणवाडीसेविकांची एकूण ४ हजार ६९८ पदे तर, मदतनिसांची ३ हजार ८३९ पदे आहेत.

loading image
go to top