
यंदाच्या १५ व्या ‘आविष्कार २०२३' स्पर्धेचे आयोजन विद्यापीठात करण्यात आले आहे.
Pune News : ‘आविष्कार’ स्पर्धेच्या परीक्षणासाठी पारदर्शक प्रणाली
पुणे - 'आविष्कार' स्पर्धेचा दर्जा आणि स्पर्धेविषयीची विश्वासार्हता कायम ठेवण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विशेष काळजी घेतली आहे. स्पर्धक संशोधक आणि त्यांच्या विद्यापीठांची ओळख उघड न होऊ देता स्पर्धेचे सुरू असणारे परीक्षण त्यामुळेच सर्वांसाठीच एक महत्त्वाचा मुद्दा ठरल्याचे शुक्रवारी दिसून आले.
यंदाच्या १५ व्या ‘आविष्कार २०२३' स्पर्धेचे आयोजन विद्यापीठात करण्यात आले आहे. मानवविद्या, भाषा, विज्ञान, औषध व औषनिर्माणशास्त्र, कृषी व पशुसंवर्धन, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान या सहा विद्याशाखांतील जवळपास ६३६ प्रकल्प यात सहभागी झाले आहेत.
पदवीधर, पदव्युत्तर, पी.एच.डी. अशा एकूण तीन पातळ्यांवर ही स्पर्धा होत आहे. सहभागींपैकी ४८ प्रकल्प पारितोषिकांसाठी निवडले जाणार आहेत. तसेच सर्वाधिक पारितोषिके मिळविणारे विद्यापीठ हे 'आविष्कार'चे सर्वसाधारण जेतेपद पटकावणार आहे. या प्रक्रियेत कोणतीही चूक होऊ नये, यासाठी आयोजन समितीने पूर्ण काळजी घेतल्याची माहिती आयोजन समितीचे सचिव प्रा. डॉ. संजय ढोले यांनी दिली.
एकूण सहभागी प्रकल्प - ६३६
विभागवार पारितोषिके -
- पदवीधर - १८
- पदव्युत्तर - १८
- पी. एच. डी. - १८

परीक्षक सर्वांना व्यवस्थित वेळ देत होते. त्यांनी जी प्रश्नोत्तरे केली त्यामुळे भविष्यातील संशोधनातील दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होईल. तसेच एकंदरीत 'आविष्कार २०२३' चे व्यवस्थापन खूप छान होते. स्वयंसेवकांनीही अत्यंत चांगल्या प्रकारे साहाय्य केले.
- आयुषा होमकर, स्पर्धक
इथे आलेला प्रत्येक स्पर्धक हा केवळ संशोधक म्हणून ओळखला जाईल. त्यासाठी सर्व स्पर्धक व त्यांच्या विद्यापीठांची ओळख गोपनीय ठेवण्यात आलेली आहे. प्रत्येक स्पर्धक हा दिलेल्या रजिस्ट्रेशन नंबरनेच ओळखला जाईल. स्पर्धेसाठीचे परीक्षक हेदेखील महाराष्ट्र राज्याबाहेरील असून कोणत्याही विद्यापीठाशी त्यांचा संबंध नाही."
- प्रा. संजय ढोले, सचिव, आयोजन समिती.