
मुलांच्या लसीकरणात पुणे ‘उणे’च!
पुणे - राज्यात कोरोना रुग्णसंख्येत अल्प प्रमाणात वाढ होत असताना, किशोरवयीन मुला-मुलींच्या लसीकरणात पुणे जिल्हा जेमतेम दुसऱ्या श्रेणीत आहे. राज्याच्या सरासरीपेक्षा या वयोगटातील पहिला डोस घेणाऱ्या मुलांची संख्या कमी असल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने दिली. शिवाय, पुढच्या आठवड्यात शाळा सुरू होणार असल्याने पालकांनी मुलांचे लसीकरण करून घ्यावे, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे.
राज्यात दर आठवड्याला कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे निरीक्षण आरोग्य खात्याने नोंदविले आहे. यापैकी सर्वाधिक वाढ सध्या मुंबईत दिसते. त्या तुलनेत पुणे शहरातील वाढ अल्प आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरण या टप्प्यावर महत्त्वाचे ठरणार आहे.
जिल्ह्याची स्थिती काय?
अठरा वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील लसीकरणात पुणे जिल्हा हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर असलेल्या मुंबईमध्ये १११.६१ टक्के पहिल्या डोसचे लसीकरण झाले आहे, तर दुसऱ्या डोसची टक्केवारी १०१.०६ आहे. दुसऱ्या क्रमांकावरच्या पुण्यात पहिल्या डोसने ११०.४१ टक्के, तर दुसऱ्या डोसची टक्केवारी ९४.५३ पर्यंत थांबली आहे.
पुणे २२ व्या क्रमांकावर
राज्यात वय वर्षे १२ ते १४ मध्ये कोव्हॅक्सिन लस देण्यात येत आहे. या वयोगटातील लसीकरणात नाशिक (८५.४६ टक्के), सांगली (८३.६९ टक्के) आणि नगर (८३.१३ टक्के) या जिल्ह्यांनी आघाडी घेतली आहे. पुणे जिल्हा या वयोगटातील लसीकरणात २२व्या क्रमांकावर मागे आहे. जिल्ह्यात पहिला डोस घेणाऱ्या मुलांची टक्केवारी ५२ असून, दोन्ही डोस घेणारी मुले २५.८९ टक्क्यांवर आहेत.

उदासीनता का?
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत १२ ते १४ वर्षे मुलांनाही संसर्ग झाल्याचे दिसून आले. यापूर्वीच्या दोन्ही लाटांमध्ये घरातील सर्वांना कोरोना झाला असला, तरीही लहान मुलांच्या कोरोना चाचण्या निगेटिव्ह आल्या होत्या. पण, तिसऱ्या लाटेत कोरोना संसर्गाचा हा कल बदलला. जानेवारी ते मार्चमध्ये काही मुलांना कोरोना झाला, त्यामुळे कोरोनाचा डोस घेणे लांबणीवर पडले.
सुरुवातीला परीक्षा असल्यामुळे आणि नंतर दोन वर्षांनंतर प्रथमच सुटीत परगावी जाता येत असल्याने लस घेणे पालकांनी टाळले.
कोरोना उद्रेक झाल्यावर लस उपयुक्त ठरेल, असा विचार होत असल्याचे पालकांशी बोलल्यानंतर समोर आले.
शाळा सुरू झाल्यानंतर लस घेऊ
कोरोना प्रतिबंधक लस घेण्याबाबत जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. ‘हर घर दस्तक’ हा एक त्यातील महत्त्वाचा टप्पा आहे. प्रत्येक घरात जाऊन नागरिकांना लस घेण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. विशेषतः १२ ते १४ वयोगटातील लसीकरणासाठी पालकांना प्रोत्साहित केले जात आहे. शाळा, महाविद्यालय सुरू झाल्यानंतर तेथेही लसीकरणाचे फायदे सांगण्यात येतील.
- डॉ. सूर्यकांत देवकर, लसीकरण अधिकारी, पुणे महापालिका
कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने मुलाला घेऊन लशीचा दुसरा डोस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर जाणार आहे. पुढील आठवड्यापासून शाळा सुरू होणार असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून ही लस घेत आहे. लशीमुळे ताप आला, तरीही पुढील पाच दिवसांत बरे वाटेल. त्यामुळे ही लस आता देत आहे.’’
- दीपाली बडबडे, पालक
Web Title: Pune Back In Children Vaccination
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..