Pune : अजित पवारांच्या इशा-यानंतर बारामतीत सरकारी अधिका-यांचे धाबे दणाणले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

Pune : अजित पवारांच्या इशा-यानंतर बारामतीत सरकारी अधिका-यांचे धाबे दणाणले

बारामती : येथील प्रशासकीय भवन येथे कामासाठी पैशांची मागणी होते, सामान्यांना वाली नाही अशा स्वरुपाची तक्रार एका जबाबदार नागरिकाने केल्याचे सांगत आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याची गांभीर्याने दखल घेत सरकारी अधिका-यांना गंभीर इशारा दिला. योग्य ती नियमांची आयुधे वापरुन या बाबत मी स्वताः पाठपुरावा करेन असा इशारा अजित पवारांनी दिल्यानंतर अनेक सरकारी अधिका-यांचे आज धाबे दणाणले.

तालुक्यातील गुनवडी येथील कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी एका पत्राचे जाहिर वाचन करत अधिका-यांना खडे बोल सुनावले. ते म्हणाले रेकॉर्डरुमध्ये जुने फेरफार, सर्व्हे नंबर, दाखले काढण्यासाठी मागेल त्या रकमेची वसूली केली जाते, कामासाठी पंधरा दिवस वाट पाहावीलागते. सॉल्व्हन्सी साठी तसेच इतर कामासाठीही काही हजारांची मागणी केली जाते, हे बारामतीत घडतेय याचे दुःख होतय. सुविधा केंद्रातही पावती दिली जाते त्यावर रक्कम मांडली जात नाही, भूमीअभिलेख कार्यालयातही पैशांची मागणी केली जाते. विशिष्ट झेरॉक्समधूनच नकाशाच्या प्रती घेण्याचा आग्रह होतो.

या पत्रात कितपत तथ्य आहे, काय चालले आहे, असा सवाल करत अजित पवार म्हणाले, उत्तम सुविधा कार्यालय तुम्हाला लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी दिलेले आहेत. पण कोणी अधिकारी चावटपणा करत असेल तर मी त्याची गय करणार नाही, नियमांची आयुधे वापरुन कारवाई करण्यासाठी मी पाठपुरावा करेन. ही गोष्ट गंभीरतेने घ्यायला पाहिजे. या कार्यालयात आता सीसीटीव्ही कॅमेरेच बसवतो, म्हणजे समजेल तरी कोण काय करत आहे ते. तुम्हाला सातवा वेतन आयोगाचा पगार आम्ही देतोय, दीड लाख कोटी रुपये वर्षाचा पगार सरकारी अधिका-यांना देत आहोत. चुकीचे काम नियमबाह्य काम करण्यासाठी आम्ही कधीच सांगणार नाही.

पदाधिका-यांचेही कान टोचताना तुम्हीही त्रयस्थ म्हणून जात काय चालल हे पाहायला हव, चुकीच काम करणा-यांवर कारवाई तर चांगले काम करणा-यांना पाठिंबा दिला जाईल, असेही अजित पवार म्हणाले.

असे पुढारपण कामाचे नाही...

नुसते पत्रिकेत नाव छापण्यापुरते पुढारपण करुन उपयोग नाही, तुम्ही तुमचा पूर्ण वेळ द्या अस मी म्हणणार नाही पण नेतृत्व करताना कष्ट करावे लागतात, पुरेसा वेळ द्यावा लागतो, असे सांगत अजित पवारांनी पदाधिका-यांचेही कान टोचले.

मला सांगा ना...

माझ्यापुढ सगळेच सुतासारखे वागतात पण माझ्याही पाठीला डोळे नाहीत, जो पर्यंत तुम्ही सांगत नाही कोण कस वागतय तो पर्यंत मला तरी कस समजणार काय सुरु आहे ते...अशा शब्दात चुकीचे काम करणा-या अधिकारी व पदाधिका-यांबाबत मला कळवा असा संदेशच अजित पवार यांनी दिला. त्यांना चार गोष्टी समजून सांगून नाही ऐकल तर पुढची कारवाई करु ना...असेही त्यांनी सांगितले.