पुणे : बारामतीत पाच अल्पवयीन भावंडे झाले बेपत्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Missing case

पुणे : बारामतीत पाच अल्पवयीन भावंडे झाले बेपत्ता

बारामती : स्थळ बारामती शहर पोलीस ठाणे सोमवार दुपारी चारची वेळ पोलीस ठाण्यात खबर येते की बारामती नजीक गुनवडी या गावातून पाच अल्पवयीन मुले अचानक बेपत्ता झाली आहेत. ही बातमी समजताच तात्काळ उपस्थित पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके यांनी पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांना या घटनेची कल्पना दिली. सध्या विधानसभेचे अधिवेशन सुरू असल्यामुळे महिला व बालकांच्या बाबतीतील कोणत्याही प्रकरणांना हलक्यात घ्यायचे नाही.

अशा सूचना पोलिसांना असल्यामुळे सुनील महाडिक यांनी तातडीने पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके, तुषार चव्हाण, अक्षय सीताप, शाहू राणे यांचे पथक तयार करून या मुलांचा शोध घेण्यास प्रारंभ केला. गुनवडी गावामध्ये माहिती घेतल्यानंतर चार अल्पवयीन मुली व एक मुलगा गायब झाल्याचे लक्षात आले. मात्र हे अपहरण होते की मुले निघून गेली आहेत हे समजण्यास मार्ग नव्हता.

ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचेही धाबे दणाणले होते. पोलिसांनी तातडीने शोध सुरू केल्यानंतर मेखळी नजिक या पाच मुलांना वालचंदनगर चा पत्ता विचारत असल्याचे एका दुकानदाराने सांगितल्यानंतर पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला. सर्वप्रथम जंक्शन येथे यातील दोन मुली पोलिसांना सापडल्या. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी आम्हाला ओमिनी गाडीतून कोणीतरी घेऊन आले असे सांगितले. त्यानंतर पोलिसांची चिंता आणखीनच वाढली. त्यांनी तातडीने वालचंदनगर पोलिसांना व वालचंदनगर येथील स्थानिक पोलीस मित्रांना याबाबत कळविले.

वेगाने शोध सुरू झाल्यानंतर आणखीन दोन मुली वालचंदनगर परिसरातच सापडल्या. या चारही मुलींना एकत्र बसवून त्यांना पोलिसांनी धीर दिल्यानंतर त्यांनी माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच गायब असलेला एक अल्पवयीन मुलगाही पोलिसांनी शोधून काढला. अभ्यास करत नाही म्हणून मामा रागावतो या कारणापोटी ही पाचही भावंडे घर सोडून निघाली होती. सर्व भावंडे मावस भाऊ बहीण आहेत. घरातून निघताना या मुलांनी चिठ्ठी देखील लिहून ठेवली होती की आम्ही घरातून निघून जात आहोत, आम्हाला शोधू नका, आम्ही मोठे बनूनच आता पुन्हा घरी येणार आहोत.

दोन सख्या बहिणींची ही पाच मुले असून या दोन बहिणी बारामतीत दवाखान्यात गेल्या असताना या पाचही भावंडांनी घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला होता. ही बाब लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांना देखील कमालीचा धक्का बसला. बारामती शहर पोलिसांनी अतिशय तत्परतेने या मुलांचा शोध घेतल्यामुळेच हे पाचही भावंडे सुखरूप पालकांच्या ताब्यात गेली, अन्यथा काही अनर्थ घडू शकला असता.

पालकांनी देखील मुलांना रागावून किंवा चिडून न सांगता त्यांना व्यवस्थित समजून सांगायला हवे असे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सांगितले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके, तुषार चव्हाण, अक्षय सीता, शाहू राणे यांच्या पथकाने अक्षरशः सात ते आठ तास सलग प्रयत्न करून हे पाचही भावंडे त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिली. पाचही भावंडे सुखरूप पालकांच्या ताब्यात दिल्यानंतर पोलिसांना देखील समाधान मिळाले. या मुलांच्या पालकांनी देखील पोलिसांचे मनापासून आभार व्यक्त केले.

Web Title: Pune Baramati Five Minor Siblings Missing Police

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..